कर्करोगाचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी वसईच्या मेघा पाटील यांना तुम्ही सहा महिन्यांच्याहून अधिक जगू शकणार नाही, असे सांगितले होते. तो एक दिवस होता. तेव्हापासून ‘उद्याचा दिवस माझा नाही’ असे म्हणत जगणाऱ्या मेघा पाटील यांना त्यांचे पती आणि मुलांनी फार मोठा धीर दिला. नव्हे जिद्दीने जगण्याचा मार्ग दाखवला. आज आठ वर्षांनंतरही आपल्या आयुष्याचा दिवा तेवत ठेवणाऱ्या मेघा पाटील यांनी ‘क ौन बनेगा करोडपती’मध्ये एक कोटी रुपये जिंकले. आणि त्यांच्या जिद्दीने अमिताभ बच्चन यांनाही जिंकून घेतले. २००६ साली मला कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हा मी गेल्यानंतर माझ्या मुलांचे कसे होणार?, ही अस्वस्थता आतून पोखरत होती. मात्र, त्यावेळी माझे पती आणि मोठी बहीण दोघांनीही मला धीर दिला. माझ्या पतींनी माझ्या उपचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. तुझा आजार हा आता उपचाराने बरा होऊ शकतो. आपण चांगले उपचार घेऊ पण, तू धीराने आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा, असे ते सांगत. त्यांच्या त्या शब्दांनी मला बळ मिळाले, असे मेघा पाटील यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. आजही मेघा यांच्यावर उपचार सुरूच आहेत. मात्र, त्यांची जिद्द संपलेली नाही. घरी शिकवणी घेणाऱ्या मेघा पाटील गेली काही वर्षे ‘केबीसी’मध्ये खेळायला मिळावे यासाठी प्रयत्नशील होत्या. मागच्या वेळी आजारपण आणि उपचार यातच अडकलेल्या मेघा पाटील यांना थोडक्यासाठी ‘केबीसी’त सहभागी होण्याची संधी गमवावी लागली होती. मात्र, यावेळी सगळ्या गोष्टी नीट जुळून आल्या असे त्यांनी सांगितले. ‘केबीसी’मध्ये हॉट सीटवर बसलेल्या मेघा पाटील यांची कहाणी ऐकून बिग बीही थक्क झाले होते. ज्या जिद्दीने तुम्ही मृत्यूला मागे टाकून आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली आहे हे कोणालाही जमणारे नाही, असे सांगत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या हिंमतीला दाद दिली. तुमच्यासारखा सकारात्मक विचार सगळ्याच महिलांनी जपला तर किती चांगले होईल, असे सांगत अमिताभ यांनी पुढेही याच जिद्दीने वाटचाल करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिल्याचे पाटील यांनी सांगितले. आत्तापर्यंत उपचारासाठी म्हणून ३५ लाख रुपये खर्च झाले आहेत. हे पैसे आपल्या पतींनी कसे उभे केले?, हे त्यांनाच माहिती आहे. ‘केबीसी’तून मिळालेल्या एक कोटी रुपये रक्कमेतून ३५ लाखांच्या या खर्चासह मुलांच्या शिक्षणाचीही तरतूद होईलच. शिवाय, पुढचे जे उपचार आहेत त्यासाठीही कोणाकडे मदत मागावी लागणार नाही, असे सांगणाऱ्या मेघा पाटील यांनी ‘केबीसी’चा हा क्षण आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले.