हॉलीवूड प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत बेसिक इन्स्टिन्क्ट स्टार मायकल डग्लस यांचे नाव घेतले जाते. निवडक चित्रपटांमधून काम करणाऱ्या ७० वर्षीय मायकल डग्लस यांनी पहिल्यांदाच माव्र्हलपटात काम केले आहे. ‘माव्र्हल’च्या आगामी ‘अॅण्टमॅन’ या चित्रपटात त्यांनी डॉक्टर हॅन्कपाइम ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
गेली कित्येक वर्षे निरनिराळ्या चित्रपटांमधून भूमिका केल्या असल्या तरी माव्र्हलच्या विश्वात याआधी कधीच पाऊल ठेवले नव्हते, असे मायकल डग्लस यांनी सांगितले. माव्र्हल कॉमिक्सचे सुपरहिरो, त्यांचे अनोखे विश्व आणि हॉलीवूडपटांमधून झालेले त्यांचे दर्शन प्रेक्षकांना अचंबित करणारे असते. पण एक कलाकार म्हणून ग्रीन स्क्रीनवरचे चित्रीकरण, स्पेशल इफेक्ट्स याचा अनुभव कधीच घेता आला नाही. ‘अॅण्टमॅन’च्या निमित्ताने पहिल्यांदाच कॉमिक्सवर आधारित चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मायकल डग्लस यांनी आनंद व्यक्त केला.
‘अॅण्टमॅन’ हा माव्र्हलच्या इतर कॉमिक्स हिरोप्रमाणे आबालवृद्धांमध्ये प्रसिद्ध आहे. पण लहानपणीसुद्धा आपण कधीच कॉमिक पुस्तकांच्या मागे नव्हतो. त्यामुळे माव्र्हलच्या या कॉमिक बुक्स विश्वाची आपल्याला फारशी कल्पना नव्हती असे डगलस यांनी सांगितले. ‘अॅण्टमॅन’साठी होकार दिल्यानंतर माव्र्हलकडून काही पुस्तके पाठविण्यात आली होती. ती वाचल्यानंतर लेखक स्टॅन्लीच्या अप्रतिम कामाचा तो खजिना आहे, हे लक्षात आल्याचे ते म्हणाले.
‘अॅण्टमॅन’मध्ये मायकल डग्लस यांनी साकारलेली ‘डॉक्टर हॅन्कपाईम’ ही व्यक्तिरेखा मध्यवर्ती आहे. एक हुशार शास्त्रज्ञ असलेले डॉ. हॅन्क हे अॅण्टमॅनच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. अॅण्टमॅनमध्ये डॉ. हॅन्क यांची तरुणपणीची आणि थोडी वयस्कर अशी दोन रूपे साकारायची होती. मात्र आपल्याला तरुण चेहरा कसा दिला जाईल याची चिंता डग्लस यांना सतावत होती. पण माव्र्हलच्या कुशल तंत्रज्ञांना सगळे शक्य आहे. त्यांनी यशस्वीरीत्या डॉ. हॅन्क यांचा रेट्रो लुक देण्याची कमाल वाटल्याबद्दल डग्लस यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव ठरला असल्याचेही डग्लस यांनी नमूद केले.