‘मराठी इंटरनॅशनल सिनेमा अ‍ॅण्ड थिएटर्स अ‍ॅवॉर्ड्स’ अर्थातच ‘मिक्ता’पुरस्कार वितरण सोहळा गेल्या आठवडय़ात दुबई येथे साजरा झाला. पुरस्कारांचे यंदा पाचवे वर्ष होते. सोहळ्याच्या निमित्ताने मराठी नाटक चित्रपट आणि मालिकांमधील कलाकारांची मांदियाळी दुबईत जमा झाली होती. दुबईत रंगलेल्या या ‘कलर्स-मिक्ता’ पुरस्कार सोहळ्याचा हा वृत्तान्त.
दुबईतील २० फेब्रुवारीची संध्याकाळ विशेष होती. ‘मराठी इंटरनॅशनल सिनेमा अ‍ॅण्ड थिएटर्स अ‍ॅवॉर्ड्स’ अर्थातच ‘कलर्स-मिक्ता’ सोहळ्याच्या निमित्ताने मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील अवघे तारे-तारकांचे मंडल येथे अवतरले होते. कलाकार जेव्हा कार्यक्रमस्थळी प्रवेश करत होते तेव्हा दुबईतील रसिकप्रिय मराठीजनांकडून टाळ्या, शिटय़ा आणि चित्कारांसह या कलाकारांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात होते. अडीच हजारांहून अधिक मराठी दुबईकर रसिकांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती.
अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाकडे अनेक मराठी कलाकार पाठ फिरवतात. नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने आयोजित दिंडीतही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच कलाकार उपस्थित असतात. नाटकाचा प्रयोग, चित्रपट किंवा मालिकांच्या चित्रीकरणामुळे आपण उपस्थित राहू शकत नाही, असे कारण त्यांच्याकडून सांगितले जाते. नाटय़ संमेलनाला उपस्थित न राहणाऱ्या मराठीतील अनेक कलाकारांची मांदियाळी मात्र ‘कलर्स मिक्ता’ पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने दुबईत जमली होती. नाटय़ संमेलनासाठी वेळ न देणाऱ्या या कलाकारांना ‘मिक्ता’साठी तीन ते चार दिवसांचा वेळ कसा काय देता आला? हे कलाकार इतक्या मोठय़ा संख्येने ‘मिक्ता’ला का हजेरी लावतात? याचे उत्तर परदेशातील चार दिवसांची धम्माल, मजा आणि मस्ती हेच आहे.
ent13महेश मांजरेकर यांच्या मुख्य संकल्पनेतून साकारलेल्या ‘मिक्ता’ सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष होते. ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अभिनेते नाना पाटेकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे या ‘स्टार’मराठी कलाकारांची विशेष उपस्थिती हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरली. दुबईत मराठी कलाकारांची लोकप्रियता किती असावी.. सहा वाजताच्या कार्यक्रमाला वेळेआधीच गर्दी करत प्रेक्षकांनी सभागृह हाऊसफुल्ल केले होते. कार्यक्रमाची सुरुवात गश्मीर महाजनी याच्या गणेशनृत्य वंदनेने झाली. मानसी नाईक आणि अन्य कलाकारांनी जुन्या गाण्यांच्या मेडलीवर ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘मेरा जुता है जपानी’, ‘हसता हुआ नुरानी चेहरा’ ही गाणी सादर केली.  
यावर्षी खरं म्हणजे मराठीत रितेशच्या निमित्ताने सलमान ‘भाऊं’ची मराठी चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून एंट्री झालीच होती. त्यात यावर्षी ‘कलर्स मिक्ता’ सोहळ्यात हिंदीतील प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान यांना ‘गर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यामुळे साहजिकच सोहळ्यात सलमान भाऊंच्या गाण्यांचाही दंगा झाला. वैभव तत्त्ववादी, आदिनाथ कोठारे, गश्मीर महाजनी यांनी सलमान खानच्या काही गाजलेल्या गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केले. प्रसिद्ध वास्तुरचनाकार अशोक कोरगावकर यांना ‘झेंडा रोविला’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांच्या हस्ते कोरगावकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी सामाजिक काम करणाऱ्या एका संस्थेला धनादेश देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या वर्षी ‘नवक्षितिज’ या संस्थेची निवड करण्यात आली होती. ‘केसरी टूर्स’ने प्रायोजित केलेला हा पुरस्कार दहा लाख रुपयांचा आहे. रकमेचा धनादेश संस्थेच्या वतीने महेश आणि मेधा मांजरेकर यांनी स्वीकारला.
या कार्यक्रमातील आणखी एक आश्चर्यचकित करणारी उपस्थिती होती ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांची.. त्यांनी चक्क ‘चांदण्यात फिरताना’, ‘दमा दम मस्त कलंदर’ आणि ‘पिया तू अब तो आजा’ सारखी गाणी सुरेल आवाजात गात उपस्थितांची दाद घेतली. अभिनेता पुष्कर क्षोत्री यांनी प्रसिद्ध निवेदक अमिन सयानी यांच्या निवेदन शैलीत सादर केलेला कार्यक्रम विशेष रंगला. या कार्यक्रमात वैभव मांगले यांनी ‘ऐसे न तुम मुझे देखो’, प्रसाद ओक यांनी ‘सामने ये कौन आया दिल में हुई हलचल’, केतकी माटेगावकर हिने ‘पिया बावरी’, सुनील बर्वेनी ‘चला जाता हुं किसी के’ आणि महेश व मेधा मांजरेकर यांनी अनुक्रमे ‘मेरे सपनों की रानी’ व ‘मेरा नाम चिनचून चिनचून’ ही गाणी सादर केली.
ent15प्रसिद्ध गायक हरिहरन आणि केतकी माटेगावकर यांनी सादर केलेल्या ‘जीव दंगला गुंगला’ आणि हरिहरन यांनी सादर केलेल्या ‘चंदा रे’ या गाण्यांनी सोहळ्याचा नूरच पालटून टाकला. त्याला जोड म्हणून गायक स्वप्निल बांदोडकरच्या ‘मला वेड लागले’ या ‘टाइमपास’ चित्रपटातील गाण्याने उपस्थितांना वेड लावले नसते तरच नवल. अवधुत गुप्ते याने ‘रेगे’ चित्रपटातील गायलेल्या गाण्याने या रंगलेल्या सोहळ्याची सांगता झाली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे लेखन-दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे होते. सचिन खेडेकर, पुष्कर क्षोत्री, डॉ. नीलेश साबळे, स्वप्निल जोशी, शशांक केतकर, तेजश्री प्रधान आदी छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावरच्या ‘स्टार’ मराठी कलाकारांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यंदाच्या ‘कलर्स मिक्ता’ सोहळ्यावर अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ चित्रपटाचा प्रभाव होता. ‘रेगे’ने सवरेत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळविलाच, पण त्याचबरोबर सवरेत्कृष्ट दिग्दर्शन (अभिजित पानसे), संवाद (प्रवीण तरडे), छायांकन (महेश लिमये), कला दिग्दर्शन (संतोष फुटाणे) हे पुरस्कारही ‘रेगे’ला मिळाले. ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाला प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार मिळाला तर ‘मि. अ‍ॅण्ड मिसेस’ हे सवरेत्कृष्ट नाटक ठरले. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाला पुनरुज्जीवित नाटकासाठीचा तर ‘लई भारी’ चित्रपटाला प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार मिळाला.  

अन्य ‘कलर्स-मिक्ता’ पुरस्कार पुढीलप्रमाणे
सवरेत्कृष्ट लेखक- विरेन प्रधान (आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे), नेपथ्य-प्रदीप मुळे (आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे), प्रकाश योजना-भूषण देसाई (मि. अ‍ॅण्ड मिसेस), संगीत- मिथिलेश पाटणकर (आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे.)
सवरेत्कृष्ट संकलन- अरिफ शेख (लई भारी), साऊंड डिझाइन- अनमोल भावे (सलाम), नृत्य दिग्दर्शन- गणेश आचार्य (लई भारी), पटकथा- अभिजित पानसे (रेगे), पाश्र्वसंगीत-अलकनंदा दासगुप्ता (फॅण्ड्री), खलनायक-शरद केळकर (लई भारी), बाल कलाकार-सुरज पवार (फॅण्ड्री), गीतकार-गुरू ठाकूर (यलो), संगीतकार-अजय-अतुल (लई भारी), गायिका-कविता कृष्णमूर्ती (पोष्टकार्ड), गायक-स्वप्निल बांदोडकर (टाइमपास),
सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री-ऐश्वर्या नारकर (आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे), अभिनेता-शशांक केतकर (गोष्ट तशी गमतीची), साहाय्यक अभिनेत्री- अमृता सुभाष (अस्तु), अभिनेता-किशोर कदम (फॅण्ड्री), सवरेत्कृष्ट अभिनेत्री-मधुरा वेलणकर (मि. अ‍ॅण्ड मिसेस), अभिनेता-चिन्मय मांडलेकर (मि. अ‍ॅण्ड मिसेस), सवरेत्कृष्ट अभिनेत्री-इरावती कर्वे (अस्तू), अभिनेता-डॉ. मोहन आगाशे (अस्तु), प्रथम पदार्पण सवरेत्कृष्ट दिग्दर्शन-समीर पाटील (पोश्टर बॉईज), प्रियदर्शन जाधव (मि. अ‍ॅण्ड मिसेस)
शेखर जोशी