प्रतिभेचा आणि कलेचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो. तसं असतं तर बहिणाबाईंसारख्या ग्रामीण पाश्र्वभूमी लाभलेल्या महिलेने तोंडात बोटं घालायला लागेल, असं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगितलं नसतं. हीच गोष्ट उच्चविद्याविभूषीत मंडळींच्या बाबतीतही लागू होते. देदीप्यमान शैक्षणिक प्रगती साधलेले अनेक जण आपापले प्रांत सांभाळून किंवा सोडून अत्युच्च कलाविष्कार करताना दिसता. फिजीओथेरपीस्ट असणाऱ्या डॉ. मीनल देशपांडे याच पंगतीत बसतात. डॉक्टर असूनही (किंवा त्याआधीपासून) त्या संगीत विशारद आहेत. गाण्यांची उर्मी कोणालाही स्वस्थ बसू देत नाहीच. त्यामुळे व्यवसायासोबत त्या कलाही जोपासत आहेत. त्यांच्या अष्टपैलू गायकीची ओळख करुन देणारे दोन नवे अल्बम औरंगाबाद येथील ‘देवमुद्रा’ने प्रस्तुत केले आहेत.
‘प्रतिबिंब’ या अल्बममध्ये एकूण १० एकलगीते असून ती सर्व मीनल यांनीच गायली आहेत. या गीतांना माधुरी नाईक यांनी स्वरसाज चढविला आहे. ‘प्रतिबिंब भंगलेले जुळवून पाहिले मी, रुसल्या मनास माझ्या वळवून पाहिले मी’ या डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या गीताने या अल्बमची सुरुवात होते. मीनल यांनी हे दुखभरं गीत समरसून गायलं आहे, त्याची चालही श्रवणीय आहे, मात्र शब्दांचे गांभीर्य त्यात पूर्णपणे प्रतिबिंबीत झाल्याचे जाणवत नाही. ‘झुलव झुलव झुलवितो, मनात प्रीत खुलवितो’ (गीत- माधुरी नाईक) हे दुसरं गाणं हटके आहे. उडत्या चालीचं आणि पाश्चिमात्य धाटणीचं हे गाणं या अल्बममधील सर्वोत्तम ठरावं. गीता दत्त यांच्या गायकीची आठवण व्हावी, अशाप्रकारे मीनल यांनी ते गायलं आहे. ‘मी तुझ्याचसाठी सांज सोबती घेते’ (गीत- डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे) या विरहगीताची चालही उत्तम जमली आहे. देशपांडे यांच्याच लेखणीतून उतरलेलं ‘वारा लबाड आहे’ हे गाणंही यात आहे. हेच गाणं यापूर्वी श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलं आहे, त्यामुळे या निमित्ताने या गीताला आणखी एक सूरावट गवसली आहे. ‘हा झिमझीमणारा पाऊस’ (गीत- माधुरी नाईक) हे आणखी एक उडत्या चालीचं गाणं ताल धरायला लावतं, यात पियानोचा केलेला उपयोग दाद देण्यासारखा आहे.
जुन्या काळातील ज्येष्ठ कवी ना. घ. देशपांडे यांची ‘उघड पाकळी, फूला रे उघड पाकळी’ या कवितेलाही यात सुरांचं कोंदण लाभलं आहे. ‘घुमत पारवा आला गं, आठवणींची नक्षी काढत सैरवैर फिरला गं’ (गीत- रजनी अकोलीकर) हे गीत ऐकताना एक छान निसर्गचित्र डोळ्यांसमोर उभं राहातं. यात सहगायिकांचा खूबीने वापर करण्यात आला आहे. ‘फुलती कलिका मन बघते’ आणि ‘मी तुझीच आहे’ ही डॉ. देशपांडे यांनी लिहीलेली गीतेही मीनल यांनी उत्कटपणे गायली आहेत. ‘सांज दिवे लागले’ (गीत- माधुरी नाईक) या गीतात समायोजित असे पूरियाचे सूर ऐकू येतात. ही सर्व गाणी एकल असूनही ती एकसूरी झालेली नाहीत, हे संगीतकार व गायिकेचे मोठे यश आहे, यात शंका नाही.

कतरा कतरा
‘प्रतिबिंब’मधील गीते ऐकून श्रुती सुखावलेल्या असतानाच ‘कतरा कतरा’मुळे आश्चर्याचा गोड धक्का बसतो. यातही सर्व एकल गीते आहेत. शिवाय, ही आठ गीते मराठी नसून देशाच्या वेगवेगळ्या भाषांचं प्रतिनिधीत्व करणारी आहेत. असं असूनही मीनल आणि माधुरी यांनी चोख आणि खणखणीत कामगिरी बजावली आहे. ही सर्व गीते माधुरी नाईक यांच्या लेखणीतून साकारली आहेत, हे आणखी एक विशेष! ‘कतरा कतरा’ या यमन रागाच्या सुरावटीतील कव्वालीने हा अल्बम सुरू होतो. ‘प्रतिबिंब’मधील गायकीपेक्षा सर्वस्वी वेगळ्या ढंगात मीनल यांनी ही कव्वाली गायली आहे. माधुरी नाईक यांनी दिलेला स्वरसाजही सफाईदार आहे. कोरस, हार्मोनियमचे तुकडे यांनी सजलेली ही कव्वाली दाद देण्यासारखीच आहे. ‘चाहत के रंग चढाओ, ओ रे पिया’ आणि ‘नीत बरसे नैन, ना दिलको चैन’ ही गीते उत्तमच, या गीतांमध्ये तालवाद्यांचा अतिशय प्रभावी उपयोग करण्यात आला आहे. मात्र, ‘हमरे देस पधारोजी केसरिया बलमाजी’ हे राजस्थानी लोकसंगीताचं वैशिष्टय़ दर्शविणारं गीत ऐकताना तुम्ही थेट मेवाडला पोहोचता! यातही कोरसचा उत्तम वापर केला आहे.
यश चोप्रा यांच्या चित्रपटात सहज खपून जाईल, असं अस्सल पंजाबी गीतंही यात आहे. ‘गली गली शोर मचावे रे’ या पंजाबी धाटणीच्या लोकगीतातील ढोल आणि ढोलकमुळे नकळत ठेका धरला जातो. ‘रब मेरा शादयानी’ या गीतात ‘जख्मोंसे भरा दामन ये मेरा, है दर्दभरी ये कहानी, जब अपनोंने की बेईमानी, रब मेरा शादयानी’  असं उत्तम काव्यही ऐकण्यास मिळतं. ढोलक आणि बुलबूलतरंगच्या सहाय्याने या गीताची रंगत वाढली आहे. ‘अब तो जीया जाए ना’ ही ठुमरीही दिलखेचक आहे. ही वैविध्यपूर्ण गीते देताना गायिका व संगीतकार आदिशक्तीला विसरल्या नाहीत.
‘हे आदिशक्ती’ या गीतात देवींची विविध रुपे व त्यांच्या महात्म्याचे वर्णन करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या ढंगातील ही सर्व गीते मीनल यांनी अतिशय समर्थपणे गायली आहेत, प्रत्येक प्रकारच्या गीताला त्यांनी सहज न्याय दिला आहे.  महिला कलाकारांच्या या जोडीकडून भविष्यातही असाच कलाविष्कार घडेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.  
(समीक्षणासाठी सीडी-डिव्हीडी आमच्या नरिमन पॉईंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.)