दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि चित्रपटांच्या आक्रमणाच्या काळातही मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवरील नाटके सादर होत असून या नाटकांना ‘बुकिंग’ही चांगले मिळत आहे. अर्थात रंगभूमीवर सादर होत असलेल्या सगळ्याच नाटकांच्या नशिबी ‘चांगल्या बुकिंग’चे भाग्य नाही.

19मराठी प्रेक्षक अजूनही नाटकवेडा असून चांगल्या नाटकांना तो अवर्जून गर्दी करतो, हे गेल्या काही महिन्यांत रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून आणि चांगल्या बुकिंगवरून समोर आले आहे. काही अपवाद वगळता आडवारी मराठी नाटकांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आणि फक्त शनिवारी आणि रविवारी चांगले बुकिंग मिळत असल्याचे नाटय़गृहातील बुकिंग क्लार्ककडून सांगण्यात आले. अपवाद वगळता नाटय़गृहातून दिवसातून तीन प्रयोग होत नसून एक किंवा दोन प्रयोगांवरच निर्मात्यांना समाधान मानावे लागत आहे.
शिवाजी मंदिर, गडकरी रंगायतन आणि दीनानाथ नाटय़गृह या तीन ठिकाणी सध्या नाटकांच्या प्रयोगांना चांगले बुकिंग मिळत आहे. त्यातही शिवाजी मंदिर आणि गडकरी रंगायतन हे अनुक्रमे एक आणि दोन क्रमांकावर असल्याचे नाटय़ व्यवसायात मानले जाते. दूरचित्रवाहिन्यांवरील काही कलाकार नाटकातून काम करत असल्याने त्यांना पाहण्यासाठी काही नाटकांना गर्दी होत आहे. तर काही नाटकांना त्यांचे सादरीकरण आणि कलाकारांसाठी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नाटकांनुसार त्या त्या नाटय़गृहातील नाटकांसाठी तिकिटाचे दर ठरविले जातात. शिवाजी किंवा गडकरीमधील काही नाटकांसाठी पहिले तिकीट हे ३०० रुपयांचे असले तरी नाटकाचा प्रेक्षक तिकीट काढून ते पाहण्यासाठी येत असल्याचे नाटय़गृहावरील बुकिंग क्लार्ककडून सांगण्यात आले.
अभिनेता शरद पोंक्षे यांचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर सादर झाले आहे. या नाटकाला चांगले बुकिंग आहे. भरत जाधव यांच्या नाटकांनाही नेहमीच चांगले बुकिंग मिळते. ‘छापा काटा’, ‘सर्किट हाऊस’ यांनाही चांगले बुकिंग असल्याचे एका नाटय़गृहातील बुकिंग क्लर्ककडून सांगण्यात आले.
नाटय़गृहाचे भाडे, कलाकारांचे मानधन आणि अन्य बाबी धरून एका नाटकाच्या प्रयोगासाठी किमान ६० हजारांपासून ते एक लाखांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे तिकिटांचे बुकिंग एक लाखाच्या पुढे गेले तर नाटक ‘चालले’ असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे बऱ्याच नाटकांचे बुकिंग ६० ते ९० हजारांपर्यंत जाते. तर काही ‘चालणाऱ्या’ नाटकांचे बुकिंग दीड ते दोन लाखांपर्यंत होत असल्याची माहिती नाटय़गृहातील बुकिंग क्लर्ककडून देण्यात आली.
‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा गडकरी रंगायतनमधील शुभारंभाचा प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाला होता. ‘नांदी’सारख्या नाटकात अनेक ‘सेलिब्रेटी’कलाकार असल्याने त्यालाही तसेच ‘पांडगो इलो रे बा इलो’ ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’ आदी नाटकांनाही चांगला प्रतिसाद आहे.
सध्या ‘चांगले’ बुकिंग असलेली नाटके गोष्ट तशी गमतीची, आई तुला मी कुठे ठेवू, वाडा चिरेबंदी, सर्किट हाऊस.