इरॉस इंटरनॅशनल’ च्या ‘फुंतरू’  या नवीन चित्रपटाचा मुहूर्त पुण्यात शुक्रवारी सायंकाळी एका शानदार समारंभात पार पडला. मराठीतील पहिली ‘सायन्स फिक्शन लव्हस्टोरी’ म्हणून हा चित्रपट ओळखला जाणार असल्यामुळे या चित्रपटाबाबत मराठी चित्रपटसृष्टीत खूप उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय ‘शाळा’ आणि ‘आजोबा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्यामुळे या चित्रपटाबाबतच्या रसिकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या गेल्या  आहेत. अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचा ‘हटके लुक’ हेही या चित्रपटाचे खास वैशिष्ठ्य असणार आहे.
‘इरॉस इंटरनैशनल’ च्या निर्मात्या क्रिशिका लुल्ला यांची ‘फुंतरू’  ही पहिलीच निर्मिती असून ‘तनू वेड्स मनु (रिटर्न्स )’ च्या अभूतपूर्व यशानंतर क्रिशिका लुल्ला आता  मराठी चित्रपटाकडे वळल्या आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत  ‘फुंतरू’ चा मुहूर्तसोहळा पार पडला. क्रिशिका लुल्ला यांच्याच हस्ते मुहूर्ताच्या दृश्याची फटमार करण्यात आली. याप्रसंगी ‘फुंतरू’  चे सर्व कलाकार तसेच तंत्रज्ञ आणि  अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पाईस स्टुडिओज एन्टरटेन्मेन्ट प्रा. लि. आणि अजय ठाकूर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.  ‘फुंतरू’  ही एक ‘सायन्स फिक्शन लव्हस्टोरी’ असून तंत्रज्ञानाचा अति वापर केल्यानंतर नेमके काय होऊ शकते त्यावर या चित्रपटात मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा स्वत: सुजय डहाके यांनीच लिहिली आहे. आशयघन कथेला श्रवणीय संगीताची जोड मिळाल्यामुळे ‘फुंतरू’ रसिकांना नक्कीच आवडेल असा विश्वास दिग्दर्शक सुजय डहाके यांना वाटतो.  ‘फुंतरू’  मध्ये केतकी माटेगावकर, मदन देवधर, शिवराज वायचळ, शिवानी रंगोले, ऋतुराज शिंदे, अंशुमन जोशी, रोहित निकम आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात केतकी माटेगावकर नेमक्या कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार याबाबत प्रचंड उत्सुकता असून त्यासाठी रंगभूषाकार विनोद सरोदे आणि वेषभूषाकार आयुषी दगड यांनी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु केले जाणार आहे.