दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात वैशाख वणव्यात ‘श्रावणात घन नीळा’ नुकताच बरसला आणि उपस्थित रसिक स्वरवर्षांवात चिंब झाले. निमित्त होते अरविंद कलायतनने आयोजित केलेल्या उत्तेजना पुरस्कार आणि ‘स्वरनिवास खळे’ स्वरवंदना सोहळ्याचे. ज्येष्ठ संगीतकार दिवंगत श्रीनिवास खळे यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. दैनिक ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
उत्तेजना पुरस्काराचे यंदाचे पहिलेच वर्ष होते. यंदा हा पुरस्कार बाल गायिका राशी हारळकर हिला पं. उल्हास बापट आणि रवींद्र साठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यानंतर खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. ‘नोटेशन गुरु’ अरविंद मुखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या कार्यक्रमात अमोल बावडेकर, माधुरी करमरकर, सुचित्रा भागवत, योगिता चितळे, विद्या करगीलकर, तेजल व्यास, सारिका शिंदे, अपर्णा उल्लाळ, राशी हरमळकर यांनी खळे यांची काही गाजलेली गाणी सादर केली. महेश खानोलकर, संदीप कुलकर्णी, दिलीप हडकर, सागर साठे, अमोघ दांडेकर, जगदीश मयेकर, अनिल करंजवकर, विनायक राणे आदींनी त्यांना संगीत साथ केली.
अंध गायिका तेजल आणि सारिका यांनी गायलेल्या भटियार रागातील संस्कृत सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
लता मंगेशकर यांनी गायलेले ‘सावलीस का कळे’ हे गाणे राशीने सादर केले. विद्या करगीलकर (पाण्यातले पाहता), अपर्णा उल्लाळ (एका तळ्यात होती), अमोल आणि योगिता (शुक्रतारा मंद वारा), सुचित्रा (बाजे रे मुरलीया), माधुरी (या चिमण्यानो परत फिरा) ही आणि अन्य गाणीही रसिकांची दाद मिळवून गेली. रंगलेल्या मैफलीची सांगता चारही गायिकांनी गायलेल्या ‘श्रावणात घन नीळा’ या गाण्याने झाली आणि रसिक ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशा भाववस्थेत मार्गस्थ झाले.