पं. भीमसेन जोशी आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी सहभाग दिलेले ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे गाणे आज इतक्या वर्षांनंतरही लोकप्रिय आहे किंवा ए. आर. रहेमानने सेलिब्रेटींना घेऊन केलेले ‘वंदे मातरम’ही अनेकांच्या स्मरणात आहे. आता बॉलीवूडचा ‘शहेनशहा’ अर्थात अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आपल्या राष्ट्रगीताचे अर्थातच ‘जनगणमन’चे सूर निनादणार आहेत. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण जवळ आले, की आपल्या देशातील वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्यांवर राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्तीविषयक गाणी, कार्यक्रम, खासगी अल्बम प्रसारित केले जातात. याचा परिणाम तात्कालिक असला तरी सर्वसामान्य जनमानसावर या गाण्यांचा निश्चितच खूप मोठा प्रभाव पडतो. एखादी सेलिब्रेटी व्यक्ती आपल्याला काही तरी सांगते आहे, हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजना, संदेश, नेत्रदान, रक्तदान अशांसारख्या सामाजिक विषयांवरही समाजप्रबोधन करण्यासाठी सेलिब्रेटींना आवर्जून घेतले जाते. आता दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत ऐकायला मिळणार आहे. अमिताभच्या आवाजातील राष्ट्रगीताच्या या व्हिडीओचे संगीत प्रसिद्ध संगीतकार इलिया राजा यांचे असून तेही यात पाहायला मिळणार आहेत. याचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले आहे.