संध्याकाळी सातचा टोला झालाच, की घराघरातून दैनंदिन मालिकांचे सूर कानी पडू लागतात. त्यात प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकघर आणि टीव्हीचा रिमोट यावर नेहमीच ‘कंट्रोल’ घरच्या स्त्रीचा असतो. पण वर्षांच्या सुरुवातीपासूनच हे वारे क्रिकेटच्या दिशेने वळू लागले होते. ‘क्रिकेट वर्ल्ड कप’ आणि ‘आयपीएल’मुळे घराघरात ‘विराटने किती रन्स काढले?’, ‘कोणी सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या?’ ही चर्चा रंगू लागली होती. रविवारी ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यासोबतच क्रिकेटचा हंगामही ओसरेल. त्यामुळे टीव्ही वाहिन्यांनी पुन्हा आपला जोम बसविण्यास सुरुवात केली आहे. मालिकांमधील घडामोडींना येत्या आठवडय़ापासून वेग पकडणार आहेत. काही नव्या मालिकांची मेजवानीही प्रेक्षकांना मिळणार आहे.
वर्ल्ड कपचे सामने भारतात सकाळी प्रक्षेपित होत होते, म्हणून त्या काळात मालिकांच्या प्राइमटाइमला धक्का पोहोचला नाही. पण सोशल मीडिया, महाविद्यालयांचे कट्टे, कार्यालयांमध्ये क्रिकेटवरच चर्चा सुरू होत्या. क्रिकेटऐवजी ‘खतरों के खिलाडी’सारख्या काही निवडक शोजच यशस्वी झाले. आयपीएलबद्दल नकारात्मक चर्चा होऊनही मागच्या पर्वापेक्षा जास्त टीआरपी या पर्वात कमविला. त्यामुळे फेब्रुवारी ते मे या दोन महिन्यांच्या सुट्टय़ांच्या हंगामाचा काहीच सदुपयोग वाहिन्यांना करता आला नाही. रॉनित रॉयसोबतची ‘इतना करो ना मुझसे प्यार’ किंवा राम कपूरची ‘दिल की बातें’सारख्या बडय़ा मालिका, ‘मनमर्जियाँ’, ‘तेरे शहर में’सारखे वेगळे विषय फसले. जुन्या मालिकांनाही प्रेक्षकांना आकर्षित करता आले नाही. आता क्रिकेटचा हंगाम शांत झाल्यावर, सर्व वाहिन्यांनी टीआरपीच्या शर्यतीत उडी घेतली.
रविवारी ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यानंतर क्रिकेटच्या चर्चेला विराम लागेल आणि वाहिन्यांनी नव्या मालिकांचे सत्र सुरू होणार आहे. जुन्या मालिकासुद्धा कथानकांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. ‘स्टार प्लस’वर ‘मेरे अंगने में’ ही वरुण बडोला, कृतिका देसाई, सुचेता त्रिवेदी अशा तगडय़ा कलाकार असलेली नवी मालिका पुढच्या महिन्यात येत आहे. वाहिनीच्या दोन मुख्य मालिका ‘दिया और बाती हम’ आणि ‘तू मेरा हिरो’मध्ये महत्त्वाचे कथानक घडणार आहे. ‘सोनी टीव्ही’वर ‘इंडियन आयडॉल ज्युनिअर’चे नवे पर्व येत आहे. महाभारताची कथा कर्णाच्या दृष्टिकोनातून सांगणारी ‘कर्ण’ ही बडय़ा बजेटची मालिकाही पुढच्या महिन्यात सुरू होईल. ‘झी टीव्ही’ने मागच्याच आठवडय़ामध्ये नवी मालिका ‘तुम्ही हो बंधू सखा तुम्ही’ आणली. त्यासोबत ‘तश्ने इश्क’ ही दोन उद्योजिकांमधील शत्रुत्वाच्या पाश्र्वभूमीवर फुलणारी मुलांची गोष्ट सांगणारी मालिकाही येणार आहे. ‘कलर्स’ वाहिनीवर ‘थपकी’ ही नवोदित तरुणी केंद्रस्थानी असलेली मालिका येत आहे. जन्मापासून तोतऱ्या बोलणाऱ्या पण पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या मुलीची गोष्ट या मालिकेत आहे. ‘सब टीव्ही’वर सुद्धा ‘कृष्ण कन्हैया’ ही नास्तिक माणसाची देवाशी गाठ घालून देणारी मालिका येत आहे. या मालिकेतून बऱ्याच दिवसांनी निखिल रत्नपारखी छोटय़ा पडद्यावर परतणार आहेत. ‘व्हॉइस’ या गाजलेल्या शोची भारतीय आवृत्ती ‘व्हाइस इंडिया’ या आठवडय़ापासून ‘अ‍ॅण्ड टीव्ही’वर सुरू होत आहे.
मराठीमध्ये जान्हवी-श्रीची गाठभेट
एकीकडे हिंदी वाहिन्या त्यांच्या नव्या ‘इनिंग’ची जोरदार तयारी करत असतानाच मराठी वाहिन्यांमध्ये येत्या काही मोठय़ा बदलाचे चिन्ह दिसत नाहीत. श्री-जान्हवीच्या ताटातुटीचे कथानक गेल्या काही दिवसांमध्ये बरेच लांबले होते. पुढच्या आठवडय़ात त्यांच्या मालिकेतील दुराव्याला पूर्णविराम लागणार आहे, तर दुसरीकडे कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती’मध्ये तुकारामांना संतत्व मिळण्याच्या वळणावर कथानक जात आहे. याखेरीज मराठीमध्ये फारसे बदल सध्या दिसणार नाहीत.