‘पीके’फे म अभिनेत्री अनुष्का शर्माची पहिली निर्मिती असलेल्या ‘एनएच-१०’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतूक केल्याने सुखावलेल्या निर्मात्यांनी ‘एनएच-१०’च्या सिक्वलचा घाट घातला आहे. ‘एनएच-१०’ची निर्मिती अनुष्का शर्मा आणि अनुराग कश्यपच्या ‘फँटम फिल्म्स’ने एकत्र मिळून केली होती. आता ‘फँ टम’ने या चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सुरू केली असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, सिक्वलपटासाठी निर्मिती आणि अभिनय या दोन्ही बाबतीत अनुष्काची काय भूमिका राहिल?, यावर अद्याप विचार झालेला नसल्याचे ‘फँ टम’ने स्पष्ट केले आहे.
‘एनएच-१०’ चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये आजवर फारसा हाताळला न गेलेला ‘रोड मुव्ही’ हा प्रकार लोकांना पहायला मिळाला. ‘रोड मुव्ही’ या जॉनरचा वापर करत आणखीही काही वेगळ्या कथा प्रेक्षकांसमोर आणता येतील, असा विश्वास ‘एनएच-१०’च्या यशाने निर्माण केला असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच या जॉनरचा वापर करून सिक्वलची तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या सिक्वलचे शीर्षक सध्या ‘एनएच-१२’ असे ठेवण्यात आले आहे.
‘एनएच-१२’ हा मध्य प्रदेशमधील जबलपूरपासून ते राजस्थानच्या जयपूपर्यंत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्ग परिसरात मद्याची तस्करी मोठय़ा प्रमाणावर केली जाते. सिक्वलमध्ये या विषयाची मांडणी असेल, असे निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे.
अनुष्कासाठी ‘एनएच-१०’ हा खूप महत्वाकांक्षी चित्रपट होता. ही तिची पहिली चित्रपटनिर्मिती असल्याने तो तिच्यासाठी खास चित्रपट आहेच. मात्र, या चित्रपटातील तिच्या कामाचीही प्रशंसा झाली आहे. ज्या धाडसाने तिने या विषयावरच्या चित्रपटनिर्मितीत तिने सहभाग घेतला त्याचेही कौतूक झाले. मात्र, सिक्वलमध्ये तिची कोणती भूमिका असणार यापेक्षाही तिच्या सहभागावरच सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘एनएच-१२’मध्ये अनुष्का आणि दिग्दर्शक नवदीप सिंग असतील की नाही?, याबद्दल आत्ता काहीही सांगणे शक्य नाही, असे ‘फँ टम’च्या सूत्रांचे म्हणणे आहे. सध्यातरी सिक्वलच्या निर्मितीसाठी ‘इरॉस’ बरोबर करार झाला असून बाकीच्या सगळ्या गोष्टी येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होतील, असे ‘फँटम फिल्म्स’च्या वतीने सांगण्यात आले.