चित्रपट अभिनेता संजय दत्त याने वाढीव रजेसाठी केलेला अर्ज शनिवारी येरवडा तुरूंग प्रशासनाकडून फेटाळण्यात आला. येरवाडा तुरूंगाच्या उपमहानिरीक्षकांनी संजय दत्तची फर्लो रजा वाढविण्याची मागणी फेटाळल्यामुळे त्याला आजच्या आज येरवडा तुरूंगात परतावे लागणार आहे. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी हत्यार बाळगल्याप्रकरणी येरवाडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त २९ डिसेंबरपासून १४ दिवसांच्या फर्लो रजेवर होता. ८ जानेवारी रोजी दुपारी आपली रजा संपवून संजूबाबा येरवडा कारागृहात परतणे अपेक्षित होते परंतु, रजा वाढविण्याच्या अर्जावर निर्णय आला नसल्याने येरवाडात दाखल होण्यास गेलेला संजय दत्त कारागृहाच्या गेटवरूनच गुरूवारी माघारी फिरला आणि पुन्हा मुंबईत आपल्या राहत्या घरी दाखल झाला. याप्रकरणावरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी संजय दत्तला झुकते माप दिल्याच्या आरोपांचा साफ इन्कार केला होता. फर्लो रजा वाढविण्याचा निर्णय चुकीचा किंवा बेकायदा असल्यास त्यामध्ये सरकार हस्तक्षेप करेल, अन्यथा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोणी कितीही प्रभावशाली असला तरी त्याचा कोणताही फरक पडणार नाही आणि सरकार आपले काम कायद्यानुसारच करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते.