जितेंद्र कन्या एकता कपूरने ज्या ‘क’ मालिकेची निर्मिती करून छोटा पडदा गाजवला. नव्हे २००० ते २००८ असे सातत्याने आठ वर्ष, आठवडय़ातले सातही दिवस मालिका चालत इतिहास घडवला तीच मालिका पुन्हा एकता जिवंत करणार असणार असल्याची चर्चा होती. एकताच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची निर्मिती असलेल्या ‘क्यूँ की सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा सिक्वल काढणार असे एकताने यावर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते. इतकेच नाही तर त्या मालिकेत सून म्हणून प्रवेश करून ‘बा’ बनून त्या मालिकेची समाप्ती केली ती स्मृती इराणी या मालिकेची सुरुवात ‘बा’च्या रूपात करणार असेही म्हटले जात होते. मात्र, आता यावरचे प्रश्नचिन्ह हटले असून, क्योकीचा सिक्वल येणार नाही हे निश्चित झाले आहे. स्मृती इराणी यांचा पंतप्रधान मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे त्यांना काही या मालिकेत काम करता येणार नसल्यामुळे क्योकीच्या सिक्वलच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
२००० साली एकताच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची निर्मिती असलेली ‘क्यूँ की सास भी कभी बहू थी’ ही मालिका छोटय़ा पडद्यावर दाखल झाली. तेव्हापासून ती जी सुरू झाली ती थांबायचे नावच घेईना. शंभर, दोनशे, चारशे करत हजार भाग झाले तरी ही मालिका एकता कपूरला थांबवावीशी वाटत नव्हती. स्मृती इराणी या मालिकेत सून म्हणून आली होती. त्यानंतर आई, सासू असं करत करत मालिकेने उडय़ांवर उडय़ा घेतल्या आणि ‘एकताकृपे’ने स्मृती ‘बा’च्या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचली. तोपर्यंत आजूबाजूच्या टेलिविश्वातही क्रांती झाली. रिअ‍ॅलिटी शोचे स्तोम मोजले तेव्हा कुठे एकताला तिच्या सगळ्याच ‘क’ मालिकांचा गाशा गुंडाळावा लागला. तेव्हा कुठे ‘क्यूं की सास भी कभी बहू थी’ ही मालिका सरतेशेवटी संपली. विराणी कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका पुन्हा सुरू करायची (दु)र्बुध्दी एकताला पुन्हा एकदा सुचणार नाही अशीच आशा करूया.