‘मेरे घर की परंपराओं का खयाल रखनेवाली, सुशील, समझदार, आदर्श लडकीही मेरी बहू बन सकती है।’ मालिकांमधील सासू हे वाक्य खडय़ा आवाजात हमखास बोलते. भरजरी साडी, त्यावर भरपूर दागिने, भडक मेकअप, कपाळावर भलीमोठी टिकली आणि रागाने मोठ्ठे झालेले डोळे.. हे नेहमीचे चित्र. पण आता ते बदलत असून ‘सासूमाँ’ हळूहळू काळानुसार आधुनिक रूप धारण करू लागल्या आहेत.
आजकाल अनेक मालिकांमधील सासवा आधुनिक अवतारात वावरू लागल्या आहेत. त्या डिझायनर साडय़ा नेसतात थोडके दागिने घालतात. महत्त्वाचे म्हणजे तारसप्तकात ओरडत फिरण्याऐवजी संयमाने, हुशारीने वागू लागल्या आहेत. अनेकजणी तर घराचा उंबरठा ओलांडून कामावरही जात आहेत. थोडक्यात त्यांचा ‘मेकओव्हर’ होत आहे.
‘स्टार प्लस’वरील ‘प्यार का दर्द है’मधील मानसी साळवीचेच उदाहरण घ्या. तिची सून ‘पंखुडी’ तिच्यासमोर फिकी पडेल असा तिचा रुबाब आहे. ती एका बडय़ा कंपनीचा डोलारा सांभाळणारी उद्योजक आहे. स्वाभाविकच उद्योजिकेला साजेशा शिफॉनच्या साडय़ा, त्याला शोभेल असा ‘नेकपीस’, उंच टाचांच्या चपला.. असे तिचे रूप आहे. ‘झी टीव्ही’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘जमाई राजा’ मालिकेतील अíचत कौर ही सुद्धा अशीच आधुनिक सासू. मालिकेतील तिच्या साडय़ांचे ब्लाऊज, मोठे इअरिरग्स, बॉबकट बदलता काळ दाखवतो. ‘लाइफ ओके’वरील ‘तुम्हारी पाखी’ मधील अनिता राज असो की ‘झी टीव्ही’वरील ‘और प्यार हो गया’मधील ‘रुक्सार रेहमान’ यासुद्धा ‘पुराने जमाने की सासूमाँ’ राहिलेल्या नाहीत!