दैनंदिन मालिकांमध्ये रोज काहीतरी नाटय़ घडवून आणण्यासाठी टीव्हीवाल्यांना काही ना काही शकला लढवाव्या लागतातच. पण, त्यांच्या या सुपीक डोक्यातून येणाऱ्या कल्पनांमध्ये आतापर्यंत व्यक्तिरेखांच्या rv17कामाच्या क्षेत्राचा किंवा करिअरचा समावेश फारच कमी प्रमाणात झाला. तसा तो न होण्यामागे सर्वात सोयीचं कारणं होतं की बडा महाल किंवा हवेलीत राहणाऱ्या या लोकांच्या नावावर एखादी मोठी कंपनी असणं सहाजिकच आहे, हे सुत्र सर्वानी नेमाने पाळलं. त्यात घरातले पुरुष दिवसभर घरी राहूनही कंपनी सुरळीत कशी चालू शकते आणि अचानक एक दिवस कंपनीला इतका मोठा तोटा होऊन सर्वाना रस्त्यावर येण्याची पाळीही येते, हे अशा कल्पनेबाहेरच्या कंपन्यांचाच कारभार मालिकांमधून सर्रास दाखविण्यात येत होता. पण, मध्यंतरीच्या काळामध्ये टीव्ही मालिकांमध्ये ‘ऑफिस’संस्कृतीचे वारे घोंगवू लागले आहेत. त्यामुळे फक्त बिल्डर होऊन इमारती बांधण्यापेक्षा जगभरातील लोक  इतर कामही करतात, याची उपरती आता टीव्हीवाल्यांना होऊ लागली असल्याचे या आठवडय़ातील मालिकांमधून दिसून येईल.
 गेल्या आठवडय़ात राजीव खंडेलवाल आणि क्रृतिका काम्रा यांची ‘रिपोर्टर्स’ ही बहुचर्चित मालिका ‘सोनी टीव्ही’वर सुरु झाली. एका वृत्तवाहिनीमध्ये बातम्या मिळविण्यासाठी किती खटपटी कराव्या लागतात यावर ही मालिका भाष्य करते. कबीर आणि अनन्या या दोन भिन्न विचारसणीच्या पत्रकारांचा सामना या आठवडय़ात पहायला मिळणार आहे. पहिल्याच आठवडय़ात राजीवच्या पुनरागमनामुळे या मालिकेची बरीच चर्चा झाली, पण, मालिकेत मांडलेली पत्रकारितेची मुल्ये, पत्रकारांचे स्टंट्स प्रेक्षकांना खटकले असल्याने त्याबद्दल सोशल मीडीयावर तक्रारीचे सूर निघाले आहेत. त्यामुळे यापुढे मालिकेतील हे पत्रकार कसे वागताहेत, हे पाहाणे उत्सुकतेचे ठरेल. पण, त्यानिमित्ताने पत्रकारिता हे नवं क्षेत्र मालिकेमध्ये बघायला मिळाल्याने मालिकेचा चेहरा नवा असल्याचा दावा वाहिनीने केला आहे. सोबतच ‘स्टार प्लस’वर ‘मनमर्जिया’ ही नवी मालिका सुरु झाली आहे. त्यात नायिका लग्नाआधी स्वत:चे करिअर घडवण्यासाठी धडपडताना दिसणार आहे. तीही लेखिका म्हणून स्वत:ची वाटा शोधताना दिसेल. ह्रषिकेशला मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या राधिकाची भेट जाहिरात कंपनीतील दोन मुलांशी होते. त्यांच्यासोबत राहिल्यानंतर तिलाही मुंबईमध्ये जाऊन आपली स्वप्न साकार करण्याची इच्छा होते. अर्थात मालिकेत तिने केवळ एक टॅगलाईन बनविल्यावर कंपनीतील तरुणी तिला लेखिका होण्याचा सल्ला देते. हे काहीसं खटकतं खरं. पण, आता आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी राधिका थेट मुंबईला येऊन दाखल होणार आहे. त्यासाठी तिला आपल्या वडिलांना तयार करण्यासाठी किती युक्त्या लढवायला लागतील, हे या आठवडय़ात कळेलच. मुंबईत अभिनेत्री बनण्यासाठी आलेल्या लक्ष्मीसमोरही  तिच्या ‘ड्रीमगर्ल’चं सत्य आता उघड झालं आहे. त्यामुळे बिथरलेली लक्ष्मी नोकरी सोडण्याच्या खटपटीमध्ये लागणार आहे. अर्थात या मालिकेतही गेल्या काही आठवडय़ांपासून बडय़ा निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये घडणाऱ्या घटना दाखविल्या जात आहेत. पण, या बडय़ा निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये इतर सर्व कामं सोडून केवळ एका मुलीला अद्दल घडविण्याच्या हेतूने सर्व ऑफिस कर्मचारी कसे गुंतू शकतात? हा छोटासा प्रश्न इथे कोणलाच पडत नाही. त्यामुळे सूडनाटय़ तेच आहे. फक्त घराऐवजी ऑफिस आणि सासू ऐवजी बॉस इतकाच काय तो फरक. ‘कुमकुमभाग्य’च्या प्रग्यालाही मॉडेलिंग करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तीही नव्या अवतारात पहायला मिळेल. एकूणच, या मालिकांचे नाटय़ तसेच असले तरी त्यांनी त्यासाठी कौटुंबिक नाटय़ाची पाश्र्वभूमी न निवडता अगदी लेखन क्षेत्रापासून मॉडेलिंगपर्यंतचा वापर केला आहे.
  वेगळ्या क्षेत्रांबद्दल बोलताना ‘दिल दोस्ती दुनियादारी’ला कसं विसरुन चालेल. संगीतकार, इव्हेंट मॅनेजर, अकाऊंटंट, अभिनेत्री, फॅशन डिझायनर अशा विविध क्षेत्राची मित्रमंडळी या मालिकेत एकत्र आहेत.  ‘माझं मन तुझे झाले’मध्ये खरंतर शेखर लेखक झाल्यावर त्याच्या व्यवसायातील पैलू पहायला मिळतील अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. पण, एक पुस्तक काढून नावारुपाला आलेला लेखकासारखा दिसणारा दहशतवादी मालिकेत आला आणि मालिकेची सर्व सूत्रंच बदलून गेली. आता खरा शेखर सापडला असला तरी शुभ्राच्या पावित्र्याच्या परिक्षा सुरु होणार आहे. गाडी पुन्हा व्यावसायिक क्षेत्रावरून कौटुंबिक नाटय़ाकडेच वळली आहे.
याखेरीज श्रीचा ‘गृहउद्योग’ कारखाना, सुरजचं मिठाईचं दुकान, संध्याची पोलीसगिरी, स्वरा-रागिणीचं गाणं असे वेगवेगळे व्यवसाय सध्या मालिकांमधून लोकांना कळत आहेत. म्हणजे, मालिकांमधील कुटुंबांतली लोकही पोटापाण्यासाठी वेगवेगळी कामं करतात असं वाटून तरी प्रेक्षक त्यांना आपलंसं करतील, अशी आपली एक वेडी आशा टीव्हीवाल्यांना वाटत असावी!