दिवंगत ज्येष्ठ कवी वसंत बापट यांच्या लेखणीतून आणि संकल्पनेतून काही वर्षांपूर्वी सादर झालेला ‘महाराष्ट्र दर्शन’ हा कार्यक्रम आता पुन्हा एकदा रसिकांपुढे सादर होणार आहे. २८ जानेवारी रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर व ३० जानेवारी रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मराठी संस्कृती आणि सांस्कृतिक लोककला, परंपरा, लोकनृत्य याची ओळख करून देण्यासाठी राष्ट्रसेवादल व पदन्यास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पुन्हा सादर करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम दृक-श्राव्य माध्यमातून सादर करण्यात येणार असून पन्नास कलाकारांचा यात सहभाग आहे. महाराष्ट्र गीत, संत परंपरा, भारूड, महाराष्ट्रातील लोककला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, नमन, गवळण, लावणी यांचा यात समावेश आहे. बदलत्या काळाबरोरच भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल, याचे दर्शनही यातून घडणार आहे.
‘महाराष्ट्र दर्शन’ या कार्यक्रमाचे मूळ लेखन वसंत बापट यांचे असून त्याचे पुनर्लेखन कवी अरुण म्हात्रे यांनी केले आहे. लोककला अभ्यासक सदानंद राणे यांचे नृत्यदिग्दर्शन, तर संगीत संयोजन अशोक वायंगणकर यांचे आहे. शरद जांभेकर, रवींद्र साठे, शशिकांत मुंब्रे, लोकशाहीर दत्ता म्हात्रे आदींनी यातील गाणी गायली आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मंदार खराडे यांचे आहे.