बॉलीवूडचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन ‘कोटय़धीश’ झाले आहेत. आपल्या ‘कोटय़धीश’पणाची बातमी त्यांनी सगळ्यात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या ‘ट्विटर’वरून जाहीर केली आहे. अर्थात अमिताभ यांचे हे ‘कोटय़धीश’पण  ‘ट्विटर’वरील फॉलोअर्सच्या संख्येचे आहे.
बहात्तर वर्षीय अमिताभ बच्चन हे काळानुरूप चालणारे असून माहिती-तंत्रज्ञानाच्या आधुनिक सोयी-सुविधांचा ते स्वत:साठी आणि त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. त्यामुळेच आजच्या समस्त तरुणाईप्रमाणेच अमिताभ यांनीही आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच आपले विचार व्यक्त करण्यासाठी ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’चा आधार घेतला आहे. या दोन्ही सोशल नेटवर्किंग साइटवर ते लोकप्रिय आहेत. ‘फेसबुक’वर अमिताभ यांच्या चाहत्यांच्या संख्येने नुकताच १ कोटी ८० लाखांच्या आकडा पार केला आहे. तर ‘ट्विटर’वरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटी २० लाख इतकी झाली आहे. अमिताभ यांनी रविवारी ‘ट्विटर’वर स्वत: ट्विट करून या बाबतची माहिती दिली आहे.
‘मला फॉलो करणाऱ्या माझ्या कोटय़वधी चाहत्यांना मनापासून धन्यवाद. तुम्ही माझ्यासमवेत यापुढेही असेच जोडले गेलेले राहाल, असा विश्वास मला वाटतो. मीसुद्धा ‘ट्विटर’च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत राहीन. सभी को मेरा प्यार..’ अशा शब्दांत अमिताभ यांनी ‘ट्विटर’वरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’ या साइटवर अमिताभ दररोज काही ना काही माहिती देत असतात. सामाजिक विषयांवर किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेवरही आपले मत व्यक्त करत असतात. आपल्या लाखो, करोडो चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे, असे अमिताभ यांचे म्हणणे आहे. या दोन साइटखेरीज अमिताभ हे ‘ब्लॉग’ही चालवितात. आपल्या मनातील विचार ते येथे व्यक्त करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचाही ते प्रचार करत आहेत. ‘आपला भारत देश नक्कीच स्वच्छ आणि सुंदर होईल, आपले विचार आणि सूचना मला जरूर कळवा’ असे ट्विटही त्यांनी ‘ट्विटर’वर केले आहे.