ऑनलाइन हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द; किंबहुना ऑनलाइन नाही तो मागासच असाच काहीसा समज झाला आहे. एखाद्याच्या हाती मोबाइल असो, आयपॅड असो, लॅपटॉप असो की घरी एखादा जड कॉम्प्युटर, काहीही असो, कसेही असो, ऑनलाइन असले की जिवात जीव येतो. सतत ऑनलाइन राहण्याचे व्यसन जडते. इंटरनेट अ‍ॅडिक्शनचा हा विषय ‘ऑनलाइन बिनलाइन’ या चित्रपटात हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मूळ विषयाबरोबरच रोमॅण्टिक कॉमेडीच्या विषयाची जोड देण्याचा प्रयत्न झाल्याने मूळ विषय नावीन्यपूर्ण असूनही पटकथेच्या मांडणीमुळे चित्रपटकर्त्यांनाच या विषयाचा विसर पडला की काय, असे वाटत राहते. त्यामुळे चित्रपट मर्यादित स्वरूपात यशस्वी ठरतो.
सिद्धार्थ देसाईला इंटरनेट, मोबाइलचे व्यसन जडते. घरातल्या घरातही तो आई-वडील घरी असतानाही त्यांच्याशी व्हिडीओ चॅट करतो. त्याच्या कॉलेजमधील त्याची मैत्रीण किमयावर सिद्धार्थचे प्रेम आहे. दुसऱ्या एका ग्रुपमधला ‘आयडिया’नामक तरुणही तिच्यावर प्रेम करतो, असा संशय सिद्धार्थला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सिद्धार्थ देसाई ऑनलाइनचा आधार घेतो. ऑनलाइनचे वेड लागल्यामुळे सिद्धार्थ शपथ घेतानाही फेसबुकची शपथ असेच म्हणतो. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून सिद्धार्थ देसाईला व्यसन जडल्याचे दाखविले आहे. या व्यसनाच्या विळख्यातून सिद्धार्थला बाहेर काढण्यासाठी त्याचे मित्र-मैत्रिणी, आई-वडील सगळे प्रयत्न करतात.
असा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. सातासमुद्रापार असणाऱ्या व्यक्तींशी ऑनलाइन राहताना जवळच्या माणसांनाच विसरतो की काय, असे प्रश्न उभे राहतात. आयुष्यातल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे इंटरनेटवर मिळतात असे नाही. या संकल्पनेभोवती ऑनलाइन बिनलाइन हा चित्रपट गुंफला आहे. सिद्धार्थच्या भूमिकेतील सिद्धार्थ चांदेकर, त्याच्या प्रेयसीच्या किमया या भूमिकेतील ऋतुजा शिंदे आणि आयडिया या भूमिकेतील हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शकाबरहुकूम केल्या आहेत. त्यातही हेमंत ढोमे गावरान धाटणीचा आयडिया दाखविताना भाव खाऊन जातो.
सिद्धार्थ आणि आयडिया हे दोघेही एकाच कॉलेजमधले असले तरी त्यांच्यात आर्थिक स्तराची तफावत दाखवली आहे. श्रीमंत असलेल्या सिद्धार्थला इंटरनेटचे व्यसन जडलेय, तर आयडियाला मोबाइल वापरायचीही फारशी हौस नाही असे दाखविले आहे. किमयाला मिळविण्यावरून सिद्धार्थ-आयडिया यांच्यात संघर्षांचा मुलामा दिल्यामुळे मूळ विषयापासून चित्रपटकर्तेच दूर जातात आणि प्रेक्षकालाही दूर नेतात.
आजच्या तरुणाईला भेडसावणारा किंवा भविष्यात निर्माण होणारा इंटरनेट अ‍ॅडिक्शन हा विषय निवडल्याबद्दल लेखक-दिग्दर्शकांना गुण द्यावे लागतील. परंतु विषय नावीन्यपूर्ण असूनही इंटरनेटच्या व्यसनाचे किती गंभीर परिणाम असू शकतात, त्याचा एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वावर किती विपरीत परिणाम होऊ शकतो, आयुष्य धोक्यात कसे येऊ शकते, या सगळ्या बारीकसारीक प्रश्नांचे दर्शन चित्रपट घडवू शकत नाही. हा विषय नावीन्यपूर्ण असला तरी मोठी त्रुटी या चित्रपटात आहे. गंभीर विषयाला वळण देऊन चित्रपटकर्त्यांनी हलकीफुलकी विनोदी झालर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उत्तम छायालेखन, कलावंतांची उत्तम टीम असूनही चित्रपट मर्यादित स्वरूपात यशस्वी ठरतो.

ऑनलाइन बिनलाइन
निर्माता – श्रेयस जाधव, नीता जाधव
दिग्दर्शक – छायालेखक – केदार गायकवाड
कथा-पटकथा-संवाद – हेमंत एदलाबादकर
संकलक – अपूर्वा मोतीवाले सहाय, आशीष म्हात्रे
संगीतकार – नीलेश मोहरीर
कलावंत – हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, ऋतुजा शिंदे, अरुण नलावडे व अन्य.