आपल्या क्षेत्रामध्ये यश मिळवत असताना कुटुंब आणि घर यामध्ये सांभाळावी लागणारी तारेवरची कसरत ही प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये एकदा तरी करावीच लागते. पण तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी घर आणि काम यात एकसूत्रता तयार करणे गरजेचे असल्याचे पाकिस्तानी अभिनेत्री नादिया जमील सांगते.
नादिया स्वत: अभिनेत्री आहेच पण, त्यासोबत ती एक यशस्वी दिग्दर्शिका, निर्माती आणि सूत्रसंचालकही आहे. ‘जिंदगी’ वाहिनीवरील ‘धूप-छाव’ या मालिकेतून ती भारतीय प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेमध्ये ती एका आधुनिक स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नापूर्वी केवळ आपल्या कामाला महत्त्व देणाऱ्या दूर-ए-शाहवर जेव्हा लग्न करुन एका सैन्यअधिकाऱ्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या घरातील सनातनी वातावरण हा तिच्यासाठी एक धक्का असतो. त्यात तिच्या सासूकडून सुद्धा तिच्यावर बंधने आणली जातात. अशा परिस्थितीतून मार्ग काढत, दूर आपले काम आणि घर यांचा मेळ कसा घालते, यावर मालिका अवलंबून आहे.
मालिकेतील आपल्या पात्राबद्दल बोलताना नादिया सांगते, ‘ही कथा फक्त दूरची नाही, तर ती जगातील प्रत्येक स्त्रीची कथा आहे. तिला आपल्या आयुष्यामध्ये एकाक्षणी काम आणि कुटुंब यांच्यातील एकाची निवड करावीच लागते.’ स्वत: आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पातळीवर काम पाहणाऱ्या नादियाने आपणही आयुष्यात ही कसरत करत असल्याचे सांगते.
‘तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे, हे आधी ठरवावे लागते. एखादवेळी करियरमध्ये वरच्या पदावर पोहचता आले नाही, तरी चालू शकते पण जर कुटुंबासोबत चांगला दिवस घालवल्याने जर तुम्हाला आनंद मिळत असेल, तर त्यात चुकीचे असे काहीच नाही,’ असे नादिया सांगते. याशिवाय नादिया स्वत: उत्तम खवय्यी असून तिला लवकरच भारतात येऊन येथील पाणीपुरी, भेळपुरी, बटर-चिकन अशा अस्सल ‘स्ट्रीटफुड’ची लज्जत चाखायची असल्याचेही ती सांगते.