मॉडेल असो किंवा मालिकेतील कलाकार शेवटचा मुक्काम म्हणून ते बॉलीवूडकडे आशा लावून पाहत असतात, हे चित्र आपल्यासाठी काही नवीन नाही. पण आता पाकिस्तानी दूरचित्रवाहिनी कलाकारांनाही बॉलीवूड खुणावू लागले आहे.
कित्येक मॉडेल्स आणि दूरचित्रवाहिनी कलाकार बॉलीवूडमध्ये आपले नाणे चालतेय का, हे एकदा तरी पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. अर्थात त्यातील काहीच यशस्वी होतात तर काही धडपडत राहातात, तर कित्येकजण ना इकडचे ना तिकडचे असे बनून राहतात. पाकिस्तानी मालिका प्रसारित करणारी ‘जिंदगी’ ही ‘झी’ची नवी वाहिनीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागली आहे. त्यामुळे पाकिस्तामधील दूरचित्रवाहिनी क्षेत्रातील हे चेहरे भारतीयांनाही परिचयाचे होऊ लागले आहेत. याच संधीचा फायदा घेत पाकिस्तानमधील काही प्रसिद्ध वाहिनीकलाकार बॉलीवूडमध्ये येण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. यामध्ये फवाद खान आणि इम्रान अब्बास लवकरच काही बिग बजेट चित्रपटांमधून लोकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत. फवाद खान आगामी ‘खूबसुरत’ या चित्रपटातून सोनम कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो एका राजकुमाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
तर इम्रान अब्बास बिपाशा बासूसोबत ‘क्रिएचर थ्रीडी’ या चित्रपटामधून पदार्पण करत आहे. याशिवाय तो मुझफ्फर अली यांच्या आगामी ‘रक्स’ चित्रपटामध्येसुद्धा दिसणार आहे. आपल्या बॉलीवूडमधील प्रवेशाबद्दल इम्रानने सांगितले, ‘बॉलीवूडमध्ये काम करायची माझी फार पूर्वीपासून इच्छा होती. पण योग जुळून येत नव्हता.’ याआधी काही कारणांमुळे ‘रामलीला’, ‘आशिकी २’, ‘गुजारिश’ या चित्रपटांमधील महत्त्वाच्या भूमिकांवर त्याला पाणी सोडावे लागले होते, असे त्याने सांगितले.
हे दोघेही पाकिस्तानी तरुणींमध्ये लाडके आहेत. फवादच्या ‘जिंदगी गुलझार है’ या मालिकेतील भूमिकेला भारतातही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्यांच्या या प्रसिद्धीचा फायदा त्यांच्या चित्रपटांनाही होईल हे वेगळे सांगायला नको.
तेथील स्त्री कलाकारांमध्येही बॉलीवूडचे आकर्षण तितकेच आहे. ‘काश मै तेरी बेटी ना होती’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली फातिमा इफुदी, ‘मात’ मालिकेतील अमिना शेखलासुद्धा बॉलीवूडमध्ये काम करायची इच्छा आहे.  
फातिमाच्या म्हणण्यानुसार, ‘आमच्याकडील दूरचित्रवाहिनी क्षेत्र चित्रपटक्षेत्रापेक्षा जास्त पुढारलेले आहे. बॉलीवूडइतके कथेबाबत प्रयोग आमच्याकडील चित्रपटांमध्ये होत नाहीत. त्यामुळे जर चांगली भूमिका मिळाली तर हिंदी चित्रपटामध्ये काम करायला नक्कीच आवडेल.’
यापूर्वी चुकीची प्रतिमा
बॉलीवूडमधील पाकिस्तानी कलाकारांचा प्रवेश हा नवीन नाही. याआधीही वीणा मलिक, मीरा, सारा लॉरेन यांसारख्या कित्येकांनी हिंदी चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमवायचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. सलमा आगा आणि झेबा बख्तियार या दोघींना एकाच चित्रपटाने भारतातही बरीच लोकप्रियता लाभली. इम्रान अब्बासच्या म्हणण्यानुसार, याआधी पाकिस्तानमधून भारतात आलेल्यांपैकी काही निवडक चेहरे सोडता इतरांमुळे पाकिस्तानी कलाकारांची चुकीची प्रतिमा भारतीयांच्या मनात तयार झाली आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानी कलाकारसुद्धा तितकेच मेहनती आहेत.
भारतीय मालिकांबाबत उदासीन
पाकिस्तानी मालिका आणि भारतीय मालिकांमधील फरक विचारला असता, मालिकांची लांबी हा सगळ्यात मोठा फरक असल्याचे पाकिस्तानी कलाकार सांगतात. ‘भारतातील मालिका लांबत जातात आणि त्यांच्यातील मूळ कथा बाजूला राहते.
या लांबत जाणाऱ्या मालिकांमध्ये काम करण्यात मला रस नाही, त्यामुळे आपण एकाच प्रकारच्या कामात अडकून पडतो,’ असे फातिमा यांनी सांगितले.