ent16‘पार्टी’ हे महेश एलकुंचवारांचं १९७६ सालचं नाटक. आज ४० वर्षांनंतरही त्यात मांडलेलं वास्तव जसंच्या तसं अबाधित आहे. किंबहुना, ते अधिकच गडद झालेलं दिसून येतं. उच्चभ्रू कला तसंच सांस्कृतिक वर्तुळातील माणसांचं जग आणि त्यांचं जगणं हा या नाटकाचा केन्द्रबिंदू आहे. या नाटकात पैसा, प्रतिष्ठा आणि सृजनात्मकता यांचं एकत्रित येणं आणि त्यातून त्यांच्यात निर्माण झालेल्या परस्परसंबंधांचा शोध लेखक एलकुंचवार यांनी घेतला आहे. सृजनशील कलावंतांबद्दल लोकांना आकर्षण असतं. त्यांना जवळून पाहण्याची, जाणून घेण्याची सुप्त जिज्ञासा त्यांना असते. त्यांच्या सहवासाची आसही अनेकांना लागलेली दिसते. उच्चभ्रू, गर्भश्रीमंत लोकही यास अपवाद नाहीत. म्हणूनच नाटक-चित्रपट-मालिकांतील कलावंतांना रग्गड दाम मोजून सार्वजनिक तसंच घरगुती समारंभांनाही बोलावण्याचं फॅड बोकाळलेलं पाहायला मिळतं. आज हे फॅड सार्वत्रिक झालेलं असलं तरी सत्तरच्या दशकात बहुधा ते तेवढं नसावं. तरीही एलकुंचवारांना ‘पार्टी’चं कथाबीज सापडावं, याचा अर्थ ते तेव्हाही असणार. अर्थात एलकुंचवारांसारखा लेखक या उच्चभ्रू वर्तुळाच्या पार्टी कल्चरचा सीमित विचार करणं शक्यच नव्हतं. त्यानिमित्तानं या वर्तुळात वावरणाऱ्या विविध स्तरांतल्या व्यक्तींचं मनोविश्लेषणाचा, त्यांच्या व्यवहार-वर्तनामागील कार्यकारणभाव जाणून घेण्याचा चाळा एलकुंचवारांना लागला असावा. हे जग तसं सर्वसामान्यांच्या परिचयाचं नसलं तरी त्याबद्दल त्यांना कुतूहल असतंच. ‘पार्टी’ त्यांची जिज्ञासा शमवतं आणि अनुभवसमृद्धही करतं.
दमयंती ही उच्चभ्रू वर्तुळातली स्त्री सतत काही ना काही कारणाने कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसाठी आपल्या घरी पार्टीचं आयोजन करत असते. ती स्वत: कलावंत नसली, सृजनकार्य करीत नसली तरीही साहित्य, नाटय़-चित्रपटादी क्षेत्राशी, त्यातल्या नामवंतांशी तिचे घनिष्ठ संबंध आहेत. अशा पाटर्य़ाद्वारे आपणही प्रतिष्ठित व्हावं हा तिचा सोस आहे. यानिमित्तानं तिला सांस्कृतिक वर्तुळात एक वजन आणि प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. मंत्री असलेल्या आपल्या वडिलांच्या वशिल्याने ती अनेक कलावंतांना परदेश दौरे, शिष्यवृत्त्या, परिसंवादाची निमंत्रणे, पुरस्कार आदी मिळवून देण्यात ती पुढाकार घेते. त्यामुळे स्वाभाविकच सांस्कृतिक वर्तुळात तिला महत्त्व आणि दबदबा आहे. नाटककार बर्वे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ दमयंतीं एका पार्टीचं आयोजन करते. या सेलिब्रेशन पार्टीला लोकप्रिय नाटककार आगाशे, तरुण होतकरू लेखक भारत, कम्युनिस्ट असलेली वंृदा, दमयंतीच्या निकटवर्तीयांपैकी डॉक्टर तसेच  मालविका व नरेंद्र हे दाम्पत्य, बर्वेची नाटय़क्षेत्रातून निवृत्ती घेतलेली अभिनेत्री पत्नी मोहिनी, पत्रकार जोगदंड, दमयंतीची मुलगी सोना ही मंडळीही हजर असतात.
पार्टी जसजशी रंगात येते तसतसे या मंडळींचे परस्परसंबंध, त्यांतले ताणतणाव, त्यांचे हेवेदावे, असूया, पूर्वग्रह, एकमेकांशी असलेले खोटे भावनिक बंध आणि त्यातलं पोकळपण, फोलपणा उलगडत जातो. सृजनाचा प्रातिभस्पर्श लाभूनही त्यांच्यातलं हीन नष्ट झालेलं नसतं. किंबहुना, काहींची सृजनशीलता हे निव्वळ थोतांडच असतं. आणि याची त्यांना स्वत:लाही जाणीव असते. या पार्टीला हजर नसलेला अमृत हाही त्यांच्यापैकीच एकजण. सृजनाला संवेदनेची क्रियाशील जोड देण्यासाठी तो आदिवासींच्या पुनरुत्थानाचं काम करण्याकरता दुर्गम भागात गेलेला आहे. पार्टीत या ना त्या कारणानं त्याचा सतत उल्लेख होत राहतो. अर्थात त्यामागे कधी आपल्या लेखनातील पोकळपणाची असलेली जाणीव दिसते, तर कधी अमृतबद्दल वाटणारी असूया.. किंवा मग त्याच्या वेडेपणाची खिल्ली उडवण्याचा सूर. पार्टीच्या निमित्तानं माणसं देहानं एकत्र येतात खरी; परंतु प्रत्यक्षात मात्र ती आपापल्या एकाकी बेटावरच जगताना दिसतात. पार्टीला येण्यामागे प्रत्येकाचे आपले एक कारण आहे. आगाशेला दमयंतीची मुलगी सोना हिच्याशी सूत जुळवायचं आहे. त्यायोगे दमयंतीच्या राजकीय संबंधांचा लाभ पदरी पाडून घेण्याचा त्याचा इरादा आहे. सोनाला मात्र आगाशे बिलकूलच आवडत नाही. त्याच्यात तिला वखवख जाणवते. आईच्या सततच्या पाटर्य़ाना आणि त्यातल्या दिखाऊपणाला, ढोंगीपणालाही ती विटलेली आहे. तिचा नुकताच प्रेमभंग झालाय. ज्याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते त्याच्यापासून तिला मूलही झालंय. या मुलाला ती प्रेमानं सांभाळत असली तरी तिचा माणूसपणावरचा विश्वास उडालाय. आपल्या आपली आई तिला अजिबात आवडत नाही. आपल्या वडिलांच्या अकाली मृत्यूला तीच कारणीभूत आहे याबद्दल तिची खात्री पटली आहे. त्यामुळे ती तिचा सतत राग राग करते.
तळागाळातून आलेला होतकरू लेखक भारत याला या उच्चभ्रू सांस्कृतिक वर्तुळात प्रस्थापित व्हायचंय आणि त्यायोगे मिळणारे लाभही हवे आहेत. ज्येष्ठ नाटककार असलेल्या बर्वेना मात्र भारतमध्ये आपला भावी प्रतिस्पर्धी स्वच्छपणे दिसतो आहे. त्याच्यात चांगलाच स्पार्क आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्याला जमेल तिथं दाबण्याचा ते प्रयत्न करतात. बर्वेची अभिनेत्री पत्नी मोहिनी हिला सार्वजनिक माहोल आवडत नाही. तिला नवऱ्यासोबतचं आपलं छोटंसं उत्कट विश्व प्राणपणानं जपावंसं वाटतं. बर्वेच्या बाबतीत ती प्रचंड पझेसिव्ह आहे. बर्वे आपल्याला कधीही सोडून जातील अशी तिला सतत भीती वाटते.
या भयगंडातून ती अधूनमधून हिस्टेरिकही होते. बर्वे तिच्या मनोरुग्णाईत अवस्थेला वैतागले आहेत. त्यांना ती आपल्या मार्गातली धोंड वाटू वागलीय. पण तिला सोडूनही देता येत नाहीए. वंृदा म्हणायला कम्युनिस्ट असली तरीही तिला श्रीमंती उपभोगांचं बिलकूल वावडं नाही. पार्टीत कुणी मासा गळाला लागतो का, हे ती चाचपत राहते. मालविका-नरेंद्र हे दाम्पत्य या पार्टीत तसं उपरंच. नरेंद्र तर मारूनमुटकूनच आलेला. त्यामुळे तो कधी एकदाची पार्टी संपतेय याची वाट बघतोय. पत्रकार जोगदंड पार्टीत येतो आणि तिथल्या सगळ्या चर्चेला एक वेगळंच वळण लागतं. तो नुकताच अमृतला भेटून आलाय. त्याचा लढा त्यानं जवळून पाहिलाय.. अनुभवलाय. ते सारं वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यासाठी तो अधीर झालाय. परंतु एवढय़ात बातमी येते : अमृत आदिवासींच्या पोलिसांबरोबरच्या लढय़ात मारला गेल्याची!
सारेच सुन्न होतात. सोना तर उन्मळूनच पडते..
मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड यांनी (डॉ. सुलभा कोरे अनुवादित) ‘पार्टी’चा हा प्रयोग बसवला होता. या प्रयोगात विद्यार्थी कलावंतांकडून संहितेतले उल्लेखित आणि अनुल्लेखित संदर्भही जिवंत करवून घेण्यात खुटवड यशस्वी झाले आहेत. कलावंतांच्या नवखेपणामुळे नाटकाची सुरुवात जरी काहीशी पोपटपंचीसारखी झाली असली तरी पुढे आशयाचा सूर गवसल्यानंतर मात्र कलाकारांनी नाटक पुरेशा गांभीर्यानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं.
एखाद् दुसरा अपवाद वगळता व्यक्तिरेखेनुरूप कलावंतांची निवड केल्यामुळे दिग्दर्शक खुटवड यांचं काम थोडंसं हलकं झालेलं दिसलं. कलावंतांनीही संहितेशी प्रामाणिक राहत चोख प्रयोग सादर केला. त्यांच्या अभिनयात उंचसखलपणा असला तरी प्रयत्न शंभर टक्के सच्चे होते. नम्रता सुळे (वंृदा), निरंजन जावीर (डॉक्टर), तन्मय सावंत (जोगदंड), शालिनी शर्मा (मोहिनी), पायल कालरा (सोना), प्रवीण खाडे (नरेंद्र), अमोल गालफाडे (भारत) यांनी आपल्या भूमिका अत्यंत समरसून केल्या. सीमा रत्तू (दमयंती), सिद्धार्थ खिरीड (बर्वे), शंतनु कोसंदर (आगाशे), दीक्षा सोनावणे (मालविका) यांच्या कामात मात्र हवी तेवढी सफाई दिसली नाही. परंतु एकूण प्रयोग मात्र परिणामकारक सादर झाला.  
संतोष जाधल यांनी साकारलेलं नेपथ्य नाटकाची मागणी पुरवणारं होतं. सुरलीन कौर यांची वेशभूषा आणि अपूर्वा-अशोक यांच्या रंगभूषेनं पात्रांना व्यक्तिमत्त्व बहाल केलं. निरंजन, पायल, अमर आणि परमेश्वर यांनी प्रकाशयोजनेतून नाटय़ांतर्गत मूड्स गडद केले.