येरवडा कारागृहातून चौदा दिवसांसाठी बाहेर पडलेल्या संजूबाबासाठी पीके चित्रपटाच्या टीमने शुक्रवारी एका खास स्क्रिनिंगचे आयोजन केले आहे. मुंबईच्या सांताक्रुझ भागातील चित्रपटगृहात हे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आल्याचे समजते. या चित्रपटात संजय दत्तने भैरोसिंह नावाची व्यक्तिरेखा साकारली असून, प्रदर्शनापूर्वी चित्रपटांच्या पोस्टरवरील त्याच्या छबीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, तुरूंगात असल्याने त्याला चित्रपट पाहता आला नव्हता. चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही त्याला भाग घेता आला नव्हता. मध्यंतरी आमीर खानने येरवडा तुरूंगात संजूबाबासाठी स्क्रिनिंग आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा होती. मात्र, आता तो तुरूंगाबाहेर असल्याने ‘पीके’च्या संपूर्ण टीमसोबत त्याला चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे.
कारागृह प्रशासनाने संजय दत्तला मंगळवारी चौदा दिवसांची अभिवाचन रजा मंजूर केली आहे. संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यातील १८ महिने शिक्षा त्याने यापूर्वी भोगली आहे. २१ मे २०१३ पासून संजय दत्त येरवडा कारागृहात आहे. या काळात त्याने स्वत:च्या पायाचे दुखणे, पत्नीचे आजारपण अशी कारणे देत रजा मिळवली. त्यात मुदतवाढ घेतली. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजय दत्त शिक्षेच्या दीड वर्षांच्या काळात संचित (पॅरोल) आणि अभिवाचन (फर्लो) रजेवर सुमारे चार महिने (११८ दिवस) कारागृहाबाहेरच आहे.