छेडछाड करणाऱ्या गुंडाशी दोन हात करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या प्रज्ञा मांढरे या महाविद्यालयीन तरुणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या शौर्याची दखल आता खुद्द अभिनेता अक्षय कुमारने घेतली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या शोसाठी त्याने प्रज्ञाला आमंत्रण दिले आहे.
२० वर्षीय प्रज्ञा बोरीवलीच्या गोराईत आई आणि लहान भावासह राहते. साठय़े महाविद्यालयात मास कम्युनिकेशनच्या तिसऱ्या वर्षांत ती शिकतेय. आपलं भलं आणि आपलं काम भलं या मध्यमवर्गीय मानसिकतेत वाढलेली. नाक्यावरील टपोरी पोरं येता जाता मुलींची छेड काढतात म्हणून पुढाकार घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांच्या मागे लागून तिने या रोडरोमियोंचा बंदोबस्त केला. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. अवघ्या काही दिवसातच तिने कांदिवली रेल्वे स्थानकात छेड काढणाऱ्या नशेखोराचे बखोट पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केलं होतं. या घटनेमुळे प्रज्ञा रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. भारतीय प्रसारमाध्यमांनी तिचं कौतुक केलं. टीव्ही माध्यमांच्या शोजमध्ये दररोज ती झळकत आहे. परंतु इंग्लंड, अमेरिकेसह  तब्बल ११ देशांतील प्रसारमाध्यामांनी तिची दखल घेत तिच्या शौर्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. एक महाविद्यालयीन तरुणी नशेखोराशी दोन हात करते याचं त्यांना भारी अप्रूप वाटलं.
 अभिनेता अक्षय कुमार गब्बर या आगामी सिनेमात अन्यायाविरोधात लढण्याचा संदेश देतोय. त्याला प्रज्ञाच्या शौर्याबद्दल समजलं. त्याने थेट प्रज्ञालाच इंडियाज गॉट टॅलेंट या रिअ‍ॅलिटी शोमध्ये बोलावलं. शुक्रवारी २७ मार्च रोजी चित्रनगरीत या भागाचं चित्रीकरण झालं.