ऐतिहासिक भूमिका साकारणे, त्या व्यक्तिरेखांना योग्य तो न्याय देणे हे कलाकारासाठी नेहमीच एक आव्हान असते. कलाकारांच्या करिअरमध्ये अशा भूमिका साकारायची संधी त्यांना क्वचितच मिळते. ‘शिवम जेमिन एंटरप्राइज प्रा.लि.’ प्रस्तुत, मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ या महत्त्वाकांक्षी सिनेमात अनेक आघाडीचे कलाकार ऐतिहासिक व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहेत. अनेक कर्तुत्ववान व्यक्तींनी पेशवेकाळात नावलौकिक मिळवला, यापैकी एक म्हणजे राघोबादादा. अटकेपार झेंडा रोवणाऱ्या राघोबादादांची व्यक्तिरेखा प्रसाद ओक हा हरहुन्नरी अभिनेता साकारतोय. अंगी शौर्य असूनही पेशवेपदापासून डावलले गेल्याने सदोदित कारस्थानामुळे ‘कलिपुरुष’ म्हणून राघोबादादा प्रसिद्ध होते. अत्यंत पराक्रमी असलेला हा पुरुष पेशवेपदाच्या सततच्या हुलकावणीने नैराश्य येऊन रंगेल, चंचल, मोहमयी दुनियेत अडकला.

या आव्हानात्मक भूमिकेच्या निमित्ताने बोलतांना प्रसाद ने सांगितलं, ‘ऐतिहासिक भूमिकांबद्दल नेहमीच मला अप्रूप वाटतं आलंय. या भूमिकांनी कायमच मला भुरळ घातली. माझ्या आजवरच्या १८-२० वर्षांच्या काळात मी एकही ऐतिहासिक व्यक्तीरेखा चित्रपटात साकारली नाही. आणि ती संधी मला मृणाल या मैत्रिणीने दिली यासाठी मी तिचे आभारच मानेन. वेगळ काहीतरी करायला मिळेल हा विश्वास होताच, पण सुरवातीला थोडं दडपण आलं. खूप मोठा सेटअप होता, राघोबादादांच्या भूमिकेबद्दल धाकधूक होती पण सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्यात. माझी टेलीव्हिजनवरील पहिली सहनायिका मृणाल होती, आता १८-२० वर्षानंतर तिच्यासोबत काम करतोय म्हणून विशेष आनंद आहे. शुटींगच्या त्या कालावधीत मृणाल अभिनेत्री म्हणून जितकी सशक्त आहे, तितकीच दिग्दर्शनात देखील कुशाग्र असल्याचा अनुभव आला. या सिनेमाच्या निमित्ताने मी बऱ्याच जणांसोबत पहिल्यांदा काम केलंय. राघोबादादांच्या भूमिकेला शौकीन, तापट, पत्नीवर प्रेम करणारा, कारस्थानी असे असंख्य कंगोरे आहेत. प्रेक्षकांना मी साकारलेला “राघोभरारी” नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे’.

राघोबादादांची पत्नी आनंदीबाई कुशाग्र बुद्धीची सोंदर्यवती म्हणून सुपरिचित होत्या, चित्रपटातील ही भूमिका सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. पतीच्या लहरी, स्वार्थी ,बेताल आणि चंचल स्वभावामुळे आनंदीबाई हताश होत. माधवरावांच्या मृत्युपर्यंत भाऊबंद्कीच्या कारस्थानात त्याना रस नव्हता. उत्तर पेशवाईत मात्र आनंदीबाई ‘ध’ चा ‘मा’ करणाऱ्या कपटी, राजकीय महत्त्वाकांक्षेनी भारलेल्या, कुटील राजकारणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. या व्यक्तिरेखेविषयी सोनाली कुलकर्णीने मनोगत व्यक्त केलं कि, ‘रमा माधव’ या ऐतिहासिक प्रेमकथेचा मी एक भाग आहे यासाठी मृणालजींची आभारी असून अभिनेत्री म्हणून वेगळ्या शेडची भूमिका साकारायला मिळाल्याचे समाधान आहे. निरागस प्रेमाची लवस्टोरी प्रेक्षकांना या निमित्ताने पहायला मिळेल शिवाय नव्या पिढीला इतिहासदेखील नव्याने उलगडेल. आनंदीबाईंची भूमिका माझ्यासाठी अनपेक्षित होती. निगेटिव्ह रोल असल्याने इतिहासातील हि व्यक्तिरेखा साकारू का ? इथपासून माझी सुरवात होती. मृणालजींनी अप्रतिमरितीने ती मांडली त्यावेळी हि भूमिका साकारायचे नक्की केले. ‘रमा माधव’ चित्रपटाच्या निमित्ताने मलाही इतिहास नव्याने कळला शिवाय पहिल्यांदा स्त्री दिग्दर्शकाकडे काम केलं हा अनुभव देखील छान होता. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात यावी अशी फिल्म ‘रमा माधव’च्या निमित्ताने माझ्या आयुष्यात आली असे मी म्हणेन’.
शिवम जेमिन एंटरप्राइज प्रा.लि.’प्रस्तुत, मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ येत्या ८ ऑगस्टला राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.