तिचं निखळ हसणं आणि हसल्यावर गालावर पडलेली खळी यावर कित्येकांनी आपला जीव ओवाळून टाकला होता. ‘दिल से’मध्ये आपल्या छोटय़ाशा भुमिकेतूनही शाहरुख खान आणि मनिषा कोइरालाच्या दमदार अभिनयासमोर स्वत:चीही नोंद लोकांना घेण्यास भाग पाडणाऱ्या प्रीती झिंटाने त्यानंतरही आपली छाप बॉलिवूडवर सोडली. ‘कभी अलविदा ना केहना’, ‘दिल चाहता है’, ‘लक्ष्य’ सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने सगळ्यांना जिंकणाऱ्या प्रीतीने तिचे लक्ष क्रिकेटच्या मैदानावर केंद्रित केले. ‘आयपीएल’च्या ‘किंग्स इलेव्हन पंजाब’ टीमचे नेतृत्व करत असताना तिने तिच्यातील व्यावसायिकतेचेही दर्शन आपल्या चाहत्यांना दिले. आता ही ‘डिम्पल क्वीन’ टीव्हीवर परतत आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘नच बलिये’च्या सातव्या पर्वाची ती परिक्षक असणार आहे. पण, परीक्षकाच्या भूमिकेत असताना एका कलाकाराची प्रेक्षकांसमोर येणारी वास्तव आयुष्यातली प्रतिमा जपणं हे सर्वात मोठं आव्हान वाटत असल्याचं प्रीतीने सांगितलं. शोच्या माध्यमातून इतरांवर कुरघोडी करण्याच्या नादात चेहऱ्यावर मुखवटा चढवून खोटं वागणं हा अतिरेकच असल्याचं ती स्पष्टपणे सांगते.
तिची आवडती जीन्स आणि सफेद टी-शर्ट घालून प्रीती मुलाखतीसाठी सज्ज झाली होती. सोबत डोक्यावर हॅट आणि खांद्यावर मोकळे सोडलेल्या केसांमधून तिच्या स्वभावातील खटय़ाळपणा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. रिअ‍ॅलिटी शोचे नवीन पर्व येताच ‘यावेळी नवे काय पहायला मिळेल?’, याची उत्सूकता प्रेक्षकांना असतेच. त्याबद्दल प्रीतीला विचारले असता, ‘यावेळी मी या शोमध्ये असणार आहे, हाच धमाका आहे, अजून काय हवं आहे?’, असं ती मिश्किलपणे विचारते. पण, त्याचवेळी यंदाच्या पर्वामध्ये प्रेक्षकांना अनेक आश्चर्याचे धक्के मिळणार असल्याची खात्री ती देते. यंदाचे पर्व इतर शोजनाही नव्याने विचार करायला भाग पाडेल, ही खात्री ती देते. गेल्या काही दिवसांपासून एकता कपूर आणि चित्रपट, मालिकेसाठी कलाकारांसोबत तिच्या कराराच्या अटींबाबत अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत. या शोची निर्मितीदेखील ‘बालाजी टेलिफ्लिम्स’ने केली असल्यामुळे प्रीतीसोबतच शोचे इतर परिक्षक, नृत्यदिग्दर्शक मर्जी, लेखक चेतन भगत तसेच स्पर्धकांनाही या शोबद्दल कोणतीही माहिती बाहेर न सांगण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळे इथे बोलतानाही शोविषयी काहीही बोलण्यापूर्वी ‘मी अमुक बोलले तर टॅक्स नाही ना लागणार?’, असे एकताचे नावही न घेता तिला चिमटे काढण्याची संधी प्रीतीने सोडली नाही. यापूर्वी प्रीती टीव्हीवर सुत्रसंचालकाच्या भूमिकेतून दोनदा प्रेक्षकांच्या समोर आली होती. त्यातला एक चॅट शो होता. पण, ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये सूत्रसंचालन करताना स्पर्धकांना दुखापत होणार नाही ना, याची काळजी तिला घ्यावी लागायची. आता या शोमध्ये मात्र तिच्यावर फक्त आणि फक्त स्पर्धकाच्या नृत्यकलेच्या परिक्षणाची जबाबदारी आहे. त्यामुळे हे काम जास्त अवघड आणि जबाबदारीने करण्याचं आहे, असं ती म्हणते. इतर परीक्षकांपेक्षा मी वागण्यात ‘कुल’ आहे म्हणून कुठल्याही स्पर्धकाने आपल्याला ‘फु ल’ समजण्याचं धाडस करु नये, असा इशाराही ती देते.
हा शो प्रामुख्याने स्पर्धक जोडीच्या नात्यावर असल्यामुळे जिंकण्यापेक्षा जोडीदाराबरोबरचं आपलं नातं जपण्याचा सल्लाही ती स्पर्धकांना देते. तुमच्या नात्यामध्ये आणि वागण्यात खरेपणा असणं, सर्वात महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत सुंदर नातं निर्माण केल्यास आयुष्यातील कोणतीही स्पर्धा सहज जिंकू शकाल ही खात्री ती देते. सर्वजण प्रशिक्षित नर्तक नसल्याची जाणीव तिला आहे. त्यामुळेच त्यांच्या नृत्याचे परीक्षण करतानाच त्यांना प्रोत्साहन देण्याचीही जबाबदारी आपल्यावर असल्याचे ती सागंते. ‘मी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी टॉमबॉय होते. मेकअप करणं, सजणं यातलं काहीच मला येत नव्हतं. पण, हळूहळू मी शिकत गेले. नृत्याच्या बाबतीतही माझं तेच होतं. माझ्या नृत्याच्या पहिल्या गुरु सरोजजींकडून मी पुष्कळ ओरडा खाल्ला आहे. पण, नवख्यांना प्रोत्साहन देण्याचा गुणही मी त्यांच्याकडूनच शिकले आहे,’असं ती सागंते. ‘नच बलिये’मध्ये याआधी करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्या स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे प्रीतीचा लूक कसा असेल, याबद्दल विचारणा केल्याबद्दल ‘मी प्रत्यक्ष आयुष्यात जशी आहे, तशीच शोमध्येही असेन’, असंच ती म्हणते. परीक्षक म्हणजे ‘रेड कार्पेट लूक’ असं म्हटलं जातं. पण, आपल्याला मात्र कधीतरी शोमध्येसुद्धा टी-शर्ट आणि जीन्स घालून जाण्याची इच्छा असल्याचं ती हसत सांगते.

‘नच बलिये’च्या सातव्या पर्वाची मी परीक्षक असणार आहे. त्यामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. आपण वागण्यात ‘कूल’ असलो, तरी आपल्याला ‘फू ल’ समजण्याचा वेडेपणा स्पर्धकांनी करू नये.
-प्रीती झिंटा