प्रिती राठी नावाच्या दिल्लीस्थित तरुणीचा अॅसिड हल्ल्यात मुंबईत मृत्यू झाला. पुण्यातील चित्रपटकर्ती मेघा रामस्वमीने या घटनेबाबत वृत्तपत्रातून वाचले आणि तिचे संवेदनशील मन हेलावले. प्रितीच्या शेजारी राहणाऱ्या बेरोजगार मुलाने प्रीतीला नोकरी लागल्यामुळे सुडाच्या भावनेने तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता, ज्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशाला हदरवून सोडले होते. मेघाने साकारलेल्या चित्रपटाच्याद्वारे आता ही घटना अमेरिकेतील लॉस एंजेलिसपर्यंत पोहोचली आहे.
प्रितीला भारतीय नौदलात परिचारिकेची नोकरी मिळाली होती. कामावर रुजू होण्यासाठी ती मुंबईत आली असताना तिच्यावर तरुणाने अॅसिड हल्ला केला. तिच्या फुफ्फुसांना फार मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते, ज्यात तिचा मृत्यू झाला. या अॅसिड हल्ल्याने तिच्या स्वप्नांचादेखील चक्काचूर केला. मेघाने या भयानक घटेनेचे वृत्त वर्तमानपत्रात वाचले. इतरांप्रमाणे फक्त बातमी म्हणून याकडे न पाहता, तिच्या संवेदनशील मनावर या घटनेचा खोल परिणाम झाला. अशा प्रकारच्या घटनेचा नुसता सहानुभूतीपूर्वक विचार न करता लोकांनी यातून बोध घ्यावा या दृष्टिकोनातून मेघा रामस्वामीने ‘न्यूबॉर्न’ चित्रपटाची निर्मिती केली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून प्रवास करून आलेल्या या चित्रपटाची ‘कोलॅबोरेटिव्ह आर्ट लॉस एंजेलिस’च्या ‘नो बजेट फिल्म्स’च्या खास प्रवर्गातील अनोख्या कलाकृतीसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नव्यादमाच्या चित्रपटकर्त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या ‘नो बजेट फिल्म्स’मधील दहा देशांतील ३० प्रवेशिकांमधून मेघाच्या ‘न्यूबॉर्न’ चित्रपटाची निवड करण्यात आली.
आठ मिनिटांच्या या चित्रपटाची निर्मिती ‘रिसायकलवाला लॅब्स’चे सोहम शहा, आनंद गांधी आणि रुची भिमानी यांनी केली असून, या वर्षाच्या सुरुवातीला टोरॅन्टोमध्ये या चित्रपटाचा प्रिमियर करण्यात आला होता. चित्रपटासाठी मेघाने केलेल्या संशोधनातून तिला ‘स्टॉप अॅसिड अॅटॅक’ या सामाजित संस्थेविषयी समजले. अॅसिडहल्ल्यातील पीडितांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या मुलींनीच अभिनय केला आहे. यामुळे त्यांना जीवनात सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे बळ प्राप्त झाले.
‘एफटीआयआय’च्या या चित्रपटकर्तीने पुण्यातील सेंट हेलेना स्कुलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले असून, सिंबायोसिसमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर तिने फ्लॉरेन्समधून स्क्रिन प्ले आणि क्रिएटिव्हिटी आर्टमधील खास अभ्यासक्रम पूर्ण केला.
आपल्या चित्रपटाची या खास पुरस्कारासाठी निवड झाल्याचा मेघाला खूप आनंद झाला आहे. मुलीने मिळविलेल्या यशाचा अभिमान वाटत असल्याची भावना ‘सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क’मध्ये ‘प्रॉजेक्ट डायरेक्टर’ म्हणून कामास असलेले मेघाचे वडील राम अय्यर आणि आई उषा रामस्वामीने व्यक्त केली. मेघाची आई उत्तम गायक आहे. ‘न्यूबॉर्न’ चित्रपट भारतात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अॅसिड हल्ल्यातून उदध्वस्त होणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याचे वास्तव समोर ठेवतो. पोलीसांकडे नोंद झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या तक्रांरीवर संथ गतीने कारवाई होत असल्याचे वास्तवदेखील हा चित्रपट दर्शवितो. ‘दिल्ली आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात’ ‘उत्तम लघुपाटा’साठीचा पुरस्कार प्राप्त केलेला हा चित्रपट ‘वुमेन्स इंटरनॅशनल फिल्म्स फेस्टिव्हल’मधील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मेघाने ‘शैतान’ चित्रपटाची पटकथा लिहिली असून, ‘जिनेव्हा चित्रपट महोत्सवा’साठी निवड झालेल्या ‘बनी’ हा लघुपटदेखील साकारला होता.