‘एम टीव्ही रोडीज’ या शोच्या मूळ संकल्पनेबाबत फार कामी लोकांना ठाऊक असेल, पण या शोचे प्रत्येक पर्व गाजते, ते त्यातील भांडणे, वादविवाद, कुरघोडीचे राजकारण आणि चटपटीत गप्पांमुळे. त्याच्या भरीस भर म्हणजे या शोच्या परीक्षकांची जोडी म्हणजेच रघू राम आणि राजीव लक्ष्मण यांच्या तिखट प्रतिक्रियांची चर्चाही बरीच गाजली होती. पण शोच्या बाराव्या पर्वामध्ये ही जोडी बदलली असून, त्यांची जागा बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल आणि बॉक्सर विजेंद्र सिंग यांनी घेतली आहे. त्यांच्यासोबत टीव्हीवरील तरुणींचा लाडका चेहरा करण कुंद्रा याचीही परीक्षकाच्या पदी वर्णी लागली आहे.

स्पर्धकांना त्यांच्यातील मूळ ताकदीची जाणीव करून देणारा आणि त्यांना प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरे जाण्याची मानसिक तयारी करून देणारा शो म्हणून ‘एम टीव्ही रोडीज’ हा शो तरुणाईत प्रसिद्ध आहे. यंदाचे या शोचे बारावे पर्व आहे. यावेळी ‘एम टीव्ही रोडीज एक्स-२’ या पर्वासाठी ईशा देओल आणि विजेंद्र सिंग टीव्ही क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहेत. लग्नानंतर ईशाने अभिनय क्षेत्रापासून विश्रांती घेतली होती. तर कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून विविध पदकांवर आपले नाव कोरणाऱ्या विजेंद्र सिंगनेही या वर्षी ‘फगली’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. करण कुंद्रा हे नाव टीव्ही क्षेत्रासाठी नवीन नाही. अभिनयापेक्षा त्याच्या लुक्ससाठी ओळखल्या जाणारा करणही यानिमित्ताने पहिल्यांदा परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या काही पर्वापासून रघु राम आणि राजीव लक्ष्मण या जुळ्या भावांच्या जोडीची शिवीगाळ, त्यांच्यामुळे उद्भवणारे वाद यांना आळा घालण्यासाठी त्यांना परीक्षकाच्या पदावरून दूर केल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांनी मात्र या अफवेला नकार दिला आहे. ईशाच्या रूपाने पहिल्यांदाच या शोला महिला परीक्षक लाभली आहे. त्यामुळे ईशा, विजेंद्र आणि करण यांना शोचे वातावरण सुधारेलका आणि शोची लोकप्रियता कायम राहील का या प्रश्नांची उत्तरे शो सुरू झाल्यावरच मिळतील.