राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते येत्या २६ मे रोजी नरेंद्र मोदी देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असून, या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱया देश-विदेशातील तीन हजारांहून अधिक पाहुण्यांच्या यादीत चित्रपटसृष्टीतील ‘सुपरस्टार्स’चाही समावेश असल्याचे समजते आहे.
रजनीकांत, अमिताभ बच्चन आणि सलमान खान या चित्रपटकलावतांनाही मोदींच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याआधी ‘सार्क’ सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांनाही ‘मोदींच्या शपथविधीला यायचं हं!’ असे आग्रहाचे खास आवतणही पाठविण्यात आले आहे. पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या कार्यक्रमाची ‘शोभा’ वाढावी याकरिता मोदी यांच्या वतीने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना खास आमंत्रणे गेली आहेत. त्यात नवाझ शरीफ सोहळ्याला उपस्थित राहणार का? यावर गेल्याकाही दिवसांपासून राजकीय वर्तुळात बराच खल सुरू आहे. या तिघांव्यतिरिक्त अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमिद करझाई, भूतानचे पंतप्रधान त्सेरिंग टोबगे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आणि मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांनाही आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले आहे.