आपल्या कामाप्रतीच्या बांधिलकीमुळे लोकसभा निवडणुकीत २४ एप्रिल रोजी मतदान करू न शकणारे बॉलिवूड चित्रपटकर्ता राकेश ओमप्रकाश मेहरांचे म्हणणे आहे की, लोकांच्या सुविधेसाठी इ-वोटिंग सुविधा अमलात आणणे गरजेचे आहे. एका पारितोषिक समारंभासाठी मेहरा अमेरिकेला जाणार असल्याने लोकसभा निवडणुकीच्या मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. ते आयफा पारितोषिकाच्या दोन्ही सत्रांत सहभागी होणार आहेत. या विषयी वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, मी इ-वोटिंगचा पुरस्कर्ता आहे. एखाद्याला कामानिमित्त प्रवास करावा लागतो, दैनंदिन जीवन सुरूच राहते. जसे आपला भारतीय क्रिकेट संघ आयपीएल सामन्यांसाठी प्रवास करत आहे. फक्त क्रिकेटपटूच नव्हे, तर अनेक भारतीय अधिकारी आणि अन्य कर्माचारी मतदान करू शकणार नाहीत. इ-वोटिंगची निश्चितच गरज आहे, ज्यामुळे जे भारतीय भारताबाहेर आहेत त्यांना जवळच्या भारतीय दूतावासात जाऊन आपले मत नोंदवता येईल. जे नागरिक वैयक्तिक अथवा कार्यालयीन कामानिमित्त देशाबाहेर आहेत त्यांना मतदानाची संधी मिळायलाच हवी, ज्यासाठी इ-वोटिंग हा उत्तम पर्याय असल्याचदेखील ते म्हणाले. जरी मेहरा मतदान करू शकणार नसले, तरी इतर सर्वजण मतदान करतील, खास करून तरुणवर्ग मतदान करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.