तिच्या दृष्टीने तिचा विवाह ही परीकथाच होती. गेली कित्येक वर्षे अभिनेत्री राणी मुखर्जीने जपून ठेवलेले तिचे प्रेम अखेर विवाहबंधनात बांधले गेले. आणि आत्तापर्यंत शांत असणाऱ्या राणीने लगेचच प्रसिद्धीमाध्यमांना निवेदन देऊन यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा याच्याशी २१ एप्रिलच्या रात्री इटलीत आपला विवाह झाल्याचे जाहीर केले. निर्माता आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांच्यातील प्रेमप्रकरणाची गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीत चर्चा सुरू होती. सोमवारी रात्री इटलीत काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह झाला.
इटलीत झालेल्या विवाहसोहळ्यानंतर यशराज फिल्म्सच्या वतीने या दोघांचा विवाह झाल्याचे अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आले. त्याच वेळी राणीनेही अधिकृत निवेदन जाहीर केले ज्यात तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या दिवसाबद्दल माझ्या चाहत्यांना सांगायचे आहे. ज्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे माझा आजवरचा प्रवास झाला आहे. माझे चाहते आजवर ज्या दिवसाची वाट बघत होते तो आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात आला याबद्दल त्यांना निश्चितच कौतुक असणार. इटलीत नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत झालेला आमचा विवाह खूप सुंदर होता. विवाहाच्या दिवशी एकाच माणसाची आपल्याला कमी जाणवते आहे ती यश चोप्रा यांची, असेही तिने पुढे म्हटले आहे.
आपल्या या विवाहाचा उल्लेख तिने परीकथा असाच केला आहे. परीकथांवर माझा नेहमीच विश्वास होता. आज या विवाहामुळे माझे आयुष्य हे अगदी त्या परीकथेप्रमाणेच झाले आहे. मी माझ्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या पर्वाचा शुभारंभ करते आहे.. ही परीकथा अशीच पुढे रंगत राहील.. असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.