बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेता श्रेयस तळपदे आता मराठी सिनेप्रेमींना खळाळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे ‘सनई चौघडे’ या चित्रपटानंतर श्रेयस आणि दीप्ती तळपदे यांनी ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती केली असून, १ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत आणि नेहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. हा चित्रपट तुम्ही का पाहाल याची कारणे…
१.चित्रपटाचा विषय- पुरुष नसबंदी या विषयावर ‘पोश्टर बॉइज’ची कथा आधारित आहे. सर्वसाधारणपणे पुरुष नसबंदी या विषयावर कोणीच बोलत नाही. मनोरंजनासोबत एका सामाजिक विषयावर चित्रपटाद्वारे लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.
२.श्रेयसचे तीन एक्के- दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हे तिघेहीजण पत्त्यातील सर्वात महत्वाचे पान असलेल्या एक्क्याप्रमाणे श्रेयसचे तीन एक्के आहेत. अनिकेत, हृषिकेश आणि दिलीप प्रभावळकर अशी भन्नाट टीम सर्वांचे मनोरंजन या चित्रपटातून करताना दिसेल.
३.दिलीप प्रभावळकर- यांचा नेहमीच वेगवेगळ्या साच्यातल्या भूमिका करण्याकडे कल असतो. त्यामुळे दिलीप प्रभावळकर या चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेत सर्वांनाच पाहायला मिळणार आहेत. ‘पोश्टर बॉईज’च्या पोस्टरवर ‘सिक्स पॅक अॅब्ज’मध्ये ते झळकू लागले तेव्हा सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला.जर पोस्टर पाहून इतकी धमाल आली तर विचार करा दिलीप प्रभावळकरांची भूमिका बघताना किती धमाल येईल. पायाला दुखापत झालेली असतानाही दिलीप काकांनी नाचण्यास होकार दिला, असे श्रेयसने सांगितले. त्यामुळे,  त्यांना नाचताना पाहण्याची संधीदेखील तुम्हाला मिळणार आहे.
४.लेस्ली लुईसचे संगीत – प्रसिद्ध संगीतकार लेस्ली लुईसनं या चित्रपटाला संगीतसाज चढवून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलंय. त्यामुळे पहिल्यांदाच बॉलिवूडच्या तोडीचं संगीत या चित्रपटाद्वारे ऐकावयास मिळणार आहे. त्याने एकाचवेळी ब्राझिलियन संगीत, लावणीचा ठेका आणि त्याचवेळी ते एक प्रेमगीत असेल असे श्रवणीय गाणे तयार केले आहे.५.फराह खान आणि रोहित शेट्टी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत- या चित्रपटात प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने भूमिका केली आहे. फराह बरोबर ‘ओम शांती ओम’ मध्ये श्रेयसने काम करताना तिच्याकडून दिग्दर्शनाची कला जाणून घेतली होती, त्यामुळे तिच्याबरोबर काम करण्याचे श्रेयसने ठाम मत केले होते आणि तिला आपल्या ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटामध्ये काम करण्यासाठी विचारलं असता फराहने लगेचच होकार दिला आणि श्रेयसचं स्वप्न पूर्ण झालं. रोहित शेट्टीसोबत श्रेयसने ‘गोलमाल’ सिरीजमध्ये कामकेले होते. त्यामुळे या दोघांची आता चांगलीच मैत्री झाली आहे.
६. चित्रपटातील सरप्राइज पॅकेज- श्रेयसने अद्यापपर्यंत काही गोष्टी गुपित ठेवल्या आहेत. श्रेयसचे हे गुपित काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहणे गरजेचे आहे.
येत्या शुक्रवारी पोश्टर बॉइज सर्वत्र प्रदर्शित होत असून त्याचसोबत श्रेयसच्या आगामी बाजी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे.