हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या ‘खुबसुरत’ या चित्रपटाच्या रिमेकपटात सोनम कपूर रेखा यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केलेली भूमिका साकारणार आहे. यानिमित्ताने रेखा यांच्यासारखी महान अभिनेत्री नेहमीच आपला आदर्श असल्याचे सोनमने सांगितले. संजय लीला भन्साळींच्या ‘सावरियाँ’ चित्रपटातून सोनमने बॉलीवूडमध्ये २००५साली पदार्पण केले होते. मात्र, सावरियाँला बॉक्स-ऑफिसवर म्हणावे तितके यश मिळाले नव्हते. गेल्या वर्षी आलेल्या ‘रांझना’ या चित्रपटाने सोनमला व्यवसायिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली होती.
८०च्या दशकातील ऋषिकेश मुखर्जींच्या खुबसूरत चित्रपटातील मंजू दयाल ही व्यक्तिरेखा रेखाने आपल्या अभिनयाने सशक्तपणे पडद्यावर साकारली होती. या चित्रपटाच्या येऊ घातलेल्या रिमेकपटात सोनम कपूरला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटाविषयी सोनमला विचारले असता तिने, आपण रेखाजींचा खुबसूरत व अन्य चित्रपट आवर्जून बघितले असल्याचे सांगितले. तसेच रेखाजींचा चित्रपटांतला अभिनय माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे सोनमने सांगितले.