‘तंटा नाय तर घंटा नाय..’, ‘आपलं सगळंच लय भारी..’ असे त्याचे संवाद सगळीकडे म्हटले जात आहेत. ‘माउली’ लय भारी म्हणून त्याचं सगळीकडे कौतुक होतं आहे. मराठीत कित्येक वर्षांनी ‘अँग्री यंग मॅन’ सापडला आहे अशा प्रकारे चित्रपटातली माउलीची अ‍ॅक्शनभरी चित्रं, छायाचित्रांनी सोशल मीडियासह सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या सगळ्यावर तुम्ही जर अभिनेता, निर्माता रितेश देशमुखला प्रतिक्रिया विचारली तर तो स्वत: थोडं थांबतो आणि तुम्हालाही सांगतो.. नाही थोडं थांबा. म्हणजे लोक आपल्यावर वेडय़ासारखं भरभरून प्रेम करीत आहेत, हे त्यालाही दिसतं आणि तो ते मान्यही करतो. आणि तरीही गेली दहा र्वष बॉलीवूडसारख्या इंडस्ट्रीत पाय रोवून उभा असल्यामुळे असेल तो म्हणतो, अजून बराच पल्ला गाठायचा आहे..
गेले दोन महिने, तीन चित्रपट आणि अतुलनीय यश असं समीकरण जुळून आल्यामुळे याच विषयावरनं गप्पांची सुरुवात के ली, तर तो पहिल्यांदा हेच सांगतो, हे तिन्ही चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले आहेत. माझ्या हातात असतं ना तर मी हे तिन्ही चित्रपट कधीच एकापाठोपाठ प्रदर्शित होऊ दिले नसते. प्रत्येक चित्रपटादरम्यान मी दोन महिन्यांचं अंतर तर नक्कीच राखलं असतं. तो हे जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्यापाठी एक अभिनेता म्हणून त्याचा हिंदीतला अनुभव तर आहेच, पण मराठी चित्रपटांचा निर्माता म्हणूनही दोन वर्षांत त्याच्या गाठीशी जो अनुभव बांधला गेला आहे त्यातूनही हे व्यावहारिक शहाणपण पहिल्यांदा डोकावतं. ‘लय भारी’तल्या माउलीचं एवढं कौतुक कशाला वाटत असेल लोकांना.. मराठीत कुठे तरी हीरो नाही ही जी एक ओरड होती ती उणीव या चित्रपटातील माउलीने भरून काढली आहे का? यावर मुळातच मराठीत हीरो नाही हे म्हणणंच आपल्याला पटत नाही, असं रितेश स्पष्ट करतो.
मराठीत ३५ कोटींचा व्यवसाय करणारे हीरोच आहेत मराठीत हीरो नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. मुळात पटकथेतून हीरो जन्माला येत असतो. आपल्याकडे वास्तवाहूनही प्रतिमा उत्कट या पद्धतीने कुठल्याच चित्रपटातून व्यक्तिरेखा रंगवली जात नाही. त्याचं कारण मराठी चित्रपटांचा आशय वेगळा असतो. कथा सांगण्याची शैली वेगळी आहे. त्यामुळे मराठी कलाकारांमध्ये हीरो नाहीत असं अजिबात नाही. उलट, इथे अनेक चांगले कलाकार आहेत, त्यांची प्रत्येकाची लोकप्रियता वेगळी आहे, त्यांची प्रत्येकाची स्वतंत्र शैली आहे, त्यांचा चाहता वर्ग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो अ‍ॅक्शन करतो तो ‘हीरो’ आणि जो विनोदी भूमिका करतो तो हीरो नाही हा आपला समजही चुकीचाच आहे. ‘दुनियादारी’सारखा चित्रपट जर २५ कोटींचा व्यवसाय करीत असेल तर ते सगळेच हीरो आहेत. ‘टाईमपास’ जर ३५ कोटींचा व्यवसाय करीत असेल तर प्रथमेश परब हा हीरो आहे. मराठीतले ३० ते ३५ कोटी हे हिंदीतल्या १०० ते १५० कोटींसारखे आहेत. आणि ते क मावणं तिथल्या मोठमोठय़ा कलाकारांनाही जमत नाही..
‘एक व्हिलन’च्या यशानंतर ‘रितेश हाच हीरो आहे’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बॉलीवूड वर्तुळातूनही व्यक्त झाल्या आणि लोकांमध्येही त्याची प्रतिमा बदलली. मात्र ही भूमिका करताना आपल्याला अशा प्रकारचं कौतुक वाटय़ाला येईल किंवा लोक कधी असा विचार करू शकतील असं वाटलंच नव्हतं, असं रितेश मनमोकळेपणे सांगतो. प्रत्येक चित्रपटाचं एक नशीब असतं. कधी कधी तुम्ही खूप नियोजन करूनही तुम्हाला यश मिळत नाही. ‘एक व्हिलन’च्या बाबतीत बोलायचं झालं तर तो लोकांनाही आवडला आणि समीक्षकांनाही आवडला. हे फार क्वचित होतं. मी याआधी ‘रण’, ‘नाच’सारखे चित्रपट केले, पण ते चालले नाहीत, त्यामुळे माझ्या कामाचं कौतुकही झालं नाही. एखादा चित्रपट समीक्षकांना आवडतो, तो लोकांना आवडत नाही. लोकांना आवडतो तो समीक्षकांना आवडत नाही. तर कधी कधी विचारपूर्वक केलेले व्यावसायिक चित्रपटही सपाटून मार खातात. त्यामुळे आपण फक्त कुटुंब नियोजन करू शकतो. बाकी कुठलेच नियोजन यशस्वी होणं हे पूर्णपणे आपल्या हातात नसतं. तुमच्या अंत:प्रेरणा आणि धैर्य याच्या जोरावर जे काम करता त्या पद्धतीने तुम्हाला यश मिळतं, असं रितेशचं म्हणणं आहे.
प्रेक्षक तुमच्याशी मनाने जोडला गेला पाहिजे..
‘एक व्हिलन’मध्ये मी पहिल्यांदाच नकारी व्यक्तिरेखा करीत होतो. पण कुठेतरी माझ्या कथेचा मीच नायक आहे असा विचार करून मी ती भूमिका केली. सिद्धार्थ आणि श्रद्धाची प्रेमकथा यात असेल, पण माझीही प्रेमकथा त्यात आहे. मुळात, तो त्या कथेत खलनायक आहे. तो एक सीरिअल किलर आहे, त्यामुळे तो हीरो होणंच शक्य नाही. पण इतक्या वाईट गोष्टी करूनही चित्रपटाच्या शेवटी कुठे तरी प्रेक्षकांना माझ्यासाठी वाईट वाटलं तर मी कलाकार म्हणून यशस्वी होईन, असा माझा विचार होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नेमकी तीच गोष्ट लोकांकडून मिळाली. प्रेक्षक तुमच्याशी मनाने जोडला गेला तरच तुमच्या अभिनयाला प्रशंसेची पावती मिळते. हे असं प्रेक्षकांशी जोडलं जाणं मला ‘एक व्हिलन’मुळे मिळालं. ‘हमशकल’, ‘धमाल’ हे चित्रपट माझ्यासाठी घरच्या अंगणात खेळण्यासारखं आहे. ‘एक व्हिलन’नंतर आता तुला थ्रिलरची कथा ऐकवायची आहे, अशा प्रकारे विचारणा होतात. त्यामुळे आता कुठे मला विविधांगी भूमिका करायला मिळणार आहेत, पर्याय मिळणार आहेत, याचंच समाधान एक कलाकार म्हणून जास्त आहे, असं रितेशने सांगितलं.
‘यलो’, ‘बीपी’सारखे चित्रपट करताना ते कुठे तरी लोकांशी जोडणारे चित्रपट आहेत हे माहीत असतं. आणि अशा चित्रपटांसाठी म्हणून जेव्हा तुम्हाला तीन-तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात तेव्हा तुमच्यासाठी धोका हा शब्दच उरत नाही, असे रितेश म्हणतो. मराठीत रवी जाधव, उमेश कुलकर्णी, नागराज मंजुळे असे दिग्दर्शक दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मी निर्माता म्हणून माझ्या परीने एक वीट ठेवतो आहे. सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर एक मजबूत घर बांधलं जाईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
एक कलाकार म्हणून मला अनुराग कश्यप, विकी बेहल, तिग्मांशू, इम्तियाज, विशाल भारद्वाज अशा दिग्दर्शकांबरोबर काम करायची इच्छा आहे. त्याचबरोबर मराठीत ‘लय भारी’सारखा पूर्ण व्यावसायिक चित्रपट करताना कलाकार आणि निर्माता म्हणूनही बरंच काही शिकून घ्यायचं असल्याचा ‘लय भारी’ मानस रितेशने व्यक्त केला आहे.