अभिनेता- निर्माता आणि आता नुकताच बाबा झालेला रितेश देशमुख हा नक्कीच एक चांगला बाबा होईल, असे रितेशची ‘लय भारी’ चित्रपटातील सहकलाकार आदिती पोहणकरने म्हटले आहे.
रितेश आणि जेनेलियाला नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. रितेश एक चांगला बाबा होईल. तो एक योग्य आणि आदर करण्याजोगा व्यक्ती आहे. त्याचे व्यक्तीमत्वही मजेशीर आहे, असे आदिती पीटीआयशी बोलताना म्हणाली. मराठी कुटुंबात जन्म घेतलेल्या आदितीने ‘लय भारी’ या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे ती म्हणाली की, रितेश एक चांगला सहकलाकारचं नाही तर तो चांगला शिक्षकही आहे. त्याच्यासोबत काम करून फार छान वाटलं. ‘लय भारी’ माझा पहिलाचं चित्रपट होता आणि मी नाटक क्षेत्रातून आले होते. माझ्यासाठी चित्रपट हे नवीन माध्यम होतं. पण, रितेशने मला खूप मदत केली. नाटकांसाठी तुम्हाला तालीम करण्याची गरज असेत तर चित्रपटांमध्ये तुम्हाला कॅमेराचे तारतम्य असणे गरजेचे आहे. या चित्रपटानंतर आदितीला बॉलीवूडमधूनही ऑफर येऊ लागल्या आहेत.