ऑक्सरच्या शर्यतीतून बर्फी चित्रपट बाहेर गेल्याने अभिनेत्री प्रियांका चोप्राने दु:ख व्यक्त केले आहे. पण भारताकडुन ऑक्सरसाठी बर्फी चित्रपटाला नामांकन मिळाल्याचा अभिमान असल्याचेही प्रियांकाने म्हटले आहे. अनुराग बसू दिग्दर्शित बर्फी चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरने एका मुक्या मुलाची भूमिका साकारली आहे. तर प्रियांका मतीमंद मुलीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ऑक्सरच्या ८५व्या  अकादमी पुरस्कारासाठी सर्वश्रेष्ठ विदेशी भाषा चित्रपटांच्या वर्गवारीत होता. पुढील अंतिम फेरीत एकूण नऊ चित्रपटांना नामांकन मिळाले यात बर्फी चित्रपटला स्थान मिळवू शकले नाही. “ऑक्सरमधून चित्रपट बाहेर गेल्याचे दु:ख आहे. परंतु, भारताकडुन ऑक्सरसाठी बर्फी चित्रपट निवडला गेला याचा मला आनंद आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खास होता याचे चित्रीकरण अगदी मनापासून करण्यात आले होते आणि चित्रपटातील माझ्या झिलमिल या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला याचा मला आनंद आहे” असे प्रियांकाने सांगितले. तसेच “चित्रपटात एका मतीमंद मुलीची भूमिका साकारायची आहे याचे मला टेन्शन होते आणि आम्हाला ज्यापद्धतीने हे पात्र साकारायचे होते त्याचपद्धतीने प्रेक्षकांनी स्विकारलेही यासाठी मी सर्व प्रेक्षकांची आभारी आहे” असेही प्रियांका पुढे म्हणाली.