शब्दांशी खेळ करणे म्हणजे साहित्य नव्हे आणि अंगविक्षेप करणे म्हणजे विनोद नव्हे असे परखड प्रतिपादन करतानाच सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षा, वेदना, अपेक्षा यांचे प्रतिबिंब साहित्यातून उमटले पाहिजे, अशी अपेक्षा माजी न्यायमूर्ती चंद्रेशेखर धर्माधिकारी यांनी बुधवारी दादर येथे व्यक्त केली.

नाटय़वर्तुळात ‘मुळ्ये काका’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अशोक मुळ्ये यांनी दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे आयोजित केलेल्या ‘असेही एक साहित्य संमेलन’ या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दूरचित्रवाहिन्या, चित्रपटासाठी कथा, पटकथा व संवाद लिहिणारे लेखक, व्यंगचित्रकार, वृत्तनिवेदक, स्तंभलेखन करणारे कलाकार आदी मंडळींसाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रातील अनेक मान्यवर संमेलनात सहभागी झाले होते.
वेदना हे विनोदाचे अधिष्ठान आहे. ज्याच्या मनात वेदना नसेल तो विनोद लिहू शकत नाही. संत आणि साहित्यिक समाज घडवितात, असे म्हटले जाते. सध्या लेखक जे काही लिहितात त्यातून कसा आणि कोणता समाज घडणार आहे, असा सवाल करून धर्माधिकारी म्हणाले की, सर्वसामान्यांच्या आकांक्षांचे दर्शन साहित्यातून घडणार नसेल तर ते साहित्य नव्हे.
स्वत:च्या वयात आलेल्या मुलीबरोबर दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम आपण एकत्र पाहू शकतो का, तसे कार्यक्रम सध्या तयार होतात का, मूल्ये आणि किंमत यांची आपण गल्लत करत आहोत का, शाब्दिक विनोदच आपण का करतो, समाजातील कुरुपता, अन्याय त्यावर आपण बोट का ठेवत नाही, असे विविध प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. संमेलन आयोजक अशोक मुळ्ये यांनी प्रास्ताविकात संमेलन आयोजित करण्याचा उद्देश सांगितला.व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, लेखक-नाटकककार संजय पवार, अभिनेत्री-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.
दूरदर्शनवरील वृत्तनिवेदक, दूरचित्रवाहिन्यांरील मालिका, चित्रपटांचे लेखक, व्यंगचित्रकार, स्तंभलेखन करणारे कलाकार, निवेदक आदी मंडळी या संमेलनास मोठय़ा संख्येने उपस्थित होती.