सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या विवाह सोहळ्याला अवघ्या बॉलीवूडकरांनी गर्दी केली होती, मात्र या सगळ्या कलाकारांच्या गर्दीतही अर्पिताचा भाऊ सलमान खान आणि तिचा मानलेला भाऊ आमिर खान हे दोघे काय करतात, याची उत्सुकता सगळ्यांना जास्त होती. अर्पिताचा विवाह सोहळा आटोपून बुधवारीच मुंबईत परतलेल्या आमिरने हा ‘खान’दानी विवाह सोहळा आपल्यासाठी सर्वात आनंदाचा आणि अविस्मरणीय होता, असे सांगितले. या विवाह सोहळ्यात आपल्या बहिणीसाठी आमिरने पुन्हा एकदा ‘आती क्या खंडाला..’ हे गाणेही गायले. सलमानची बहीण ही माझ्या बहिणीसारखीच आहे. त्यामुळे त्यासाठी सलमानने निमंत्रण देण्याची गरज नाही. निमंत्रण मिळाले नाही तरी मी या विवाह सोहळ्याला हजर राहणारच, असे सांगणाऱ्या आमिरने खरोखरच अगदी या घरचा एक सदस्य असल्याप्रमाणेच हा सोहळा अनुभवला. अर्पिताचा विवाह सोहळा एकदम छान होता. सलमानचे कुटुंबच इतके गोड आहे की, त्यांच्यात कोणीही सामील झाला तर त्याला आनंदच साजरा करता येतो. हा आनंद आपल्याला अर्पिताच्या विवाह सोहळ्यात मिळाल्याचे आमिरने सांगितले. सध्या राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यग्र असलेल्या आमिरसाठी हा घरचा सोहळा एक आनंददायी आणि मनाला ताजातवाना करणारा अनुभव होता हे त्याच्या चेहऱ्यावरूनच जाणवते. या विवाह सोहळ्यात आम्ही सगळे बॉलीवूड कलाकार अगदी घरच्यासारखेच सामील झालो होतो. प्रत्येकाने तिथे गाणी म्हटली, नृत्य केले. सलमान नृत्य चांगले करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र अरबाझनेही या सोहळ्यात छान नृत्य करून मला धक्काच दिला, असे आमिरने सांगितले; पण आमिरला नृत्य करणे अवघड जात होते. ‘‘सलमानच्या मदतीने मी काही स्टेप्स करत होतो,’’ असे सांगणाऱ्या आमिरने अखेर सगळ्यांच्या आग्रहास्तव ‘गुलाम’ चित्रपटातील त्याने गायलेले ‘आती क्या खंडाला..’ हे गाणे पुन्हा सादर केले. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘गुलाम’ चित्रपटात आमिरने हे गाणे गायले होते. त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी त्याने हे गाणे गायले.
अर्पिताची सासरी पाठवणी करताना भाऊ म्हणून सलमानप्रमाणेच आमिरही भावुक झाला होता का? असे विचारल्यावर बहिणीची पाठवणी केली म्हणजे तिचे घराशी असलेले नाते कायमचे संपले, असे आपल्याला वाटत नाही, असे त्याने सांगितले. तिची पाठवणी ही आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता; पण तरीही एक क्षण असा होता जेव्हा आम्हाला सगळ्यांनाच अश्रू आवरले नाहीत, असे तो म्हणाला. अर्पिताने आपल्या घरच्यांसाठी एक संदेश लिहिला होता. या घरात तिला मिळालेले प्रेम, तिच्या आठवणी, सगळ्यांबद्दल तिने लिहिले होते; पण ती स्वत: इतकी भावुक झाली होती, की तिने आपल्या वतीने प्रियांका चोप्राला हा संदेश वाचून दाखवायला सांगितला. तिने जे काही लिहिले होते ते ऐकल्यानंतर सगळ्यांनाच अश्रू आवरले नाहीत, अशी आठवणही आमिरने सांगितली.