‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सामाजिक हित जोपासणारा असून तो करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी अभिनेता सलमान खानने केली आहे. त्यासाठी चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान आणि सलमानची बहीण अलविरा खान यांनी मंगळवारी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली. या चित्रपटात भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंधावर सकारात्मक भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे तो ‘टॅक्स फ्री’ व्हायला हवा. आमच्या चित्रपटापासून सरकारने पैसा कमवावा असे आम्हालाही वाटते. पण तो पैसा समाजाच्या भल्यासाठी, विकासासाठी वापरायला हवा. ते होत नसेल सरकारने चित्रपट करमुक्त करावा, असे मत सलमान खानने व्यक्त केले आहे.
पाकिस्तानातील एक मुलगी वाट चुकते आणि सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत येते. भारतात ही मुलगी सलमान खानला भेटते. ती पाकिस्तानी असून चुकून भारतात आल्याचे कळल्यानंतर सलमान तिला पुन्हा तिच्या घरी सोडण्याची जबाबदारी घेतो’, अशा कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. यापूर्वी सलमान खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही हा चित्रपट पाहावा,’ असे आवाहन केले होते.