सुपरस्टार कलाकाराची बहिण असणे म्हणजे काय याची प्रचिती बॉलिवूडसह सर्वसामान्य लोकांनी सलमानची बहिण अर्पिता खान हिच्या शानदार विवाह सोहळ्यात घेतली आहे. सलमान, सोहैल आणि अरबाझ या तिघा भावांची लाडकी बहिण असलेली अर्पिता हैद्राबादमधील ‘फलकनुमा पॅलेस’ नावाच्या शाही महालात तिचा प्रियकर आयुष शर्मा याच्याशी विवाहबध्द झाली. आपल्या लाडक्या बहिणीची पाठवणी करताना कोटय़वधींची भेट ‘भाई’ सलमान खानने अर्पिताला दिली आहे. 

अर्पिता आणि आयुषच्या विवाहसोहळ्याच्या आधीच सलमानने अर्पिताला वांद्रयातील कार्टर रोडवर १६ कोटींचा फ्लॅट भेट म्हणून दिल्याची चर्चा सुरू झाली होती. ज्या फलकनुमा पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला, त्याचे एकदिवसाचे भाडे १ कोटी रुपये होते. हा पॅलेस विवाहासाठी तीन दिवस घेण्यात आला होता. मात्र, ही ‘एवढीशी’ महागडी भेट देऊनही भाईचे बहिणीवरचे प्रेम तिला शांत होऊ देत नव्हते. म्हणूनच की काय पण, विवाह संपून अर्पिताची पाठवणी होण्याआधीच सलमानने तिला आणखी एक महागडी भेट दिली. सलमानने अर्पिताला रोल्स रॉईस ही आलिशान गाडी लग्नात भेट म्हणून दिली आहे. अर्पिता ही सलमानची सगळ्यात लाडकी बहिण आहे. सलमानच्या कपडय़ांपासून त्याच्या सतत बदलणाऱ्या प्रेयसीपर्यंत अर्पिताला सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्याच्यावर चालणाऱ्या खटल्यांच्या सुनावणी दरम्यानही अर्पिता कायम त्याच्याबरोबर सावलीसारखी वावरली आहे. त्यामुळे या भावा-बहिणीचे घट्ट नाते अगदी बॉलिवूडसाठीही चर्चेचा विषय राहिला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द पटकथा लेखक म्हणून नावाजलेल्या सलीम खान यांचे कुटुंब हे जाती-धर्मापलिकडे जाऊन प्रेमाच्या घट्ट नात्यांनी बांधले गेले आहे. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबात जो गोडवा आहे तो दुसरीकडे कुठेही नाही, असे आमिरसारख्या कलाकारानेही मान्य केले आहे. सलीम खान, त्यांची पत्नी सलमा खान आणि दुसरी पत्नी हेलन यांच्याबरोबर सलमान, अरबाझ, सोहैल, अलविरा आणि अर्पिता ही भावंडे हे संपूर्ण ‘खान’दान गुण्यागोविंदानेच नांदताना आजवर सगळ्यांनी पाहिले आहे. अर्पिता हे या ‘खान’दानातील शेंडेफळ. सलीम खान आणि हेलन यांची दत्तक मुलगी असलेली अर्पिता ही सलमानचीच नव्हे तर या ‘खान’दानाची लाडकी आहे. आणि या प्रेमाची प्रचिती तिच्या विवाहसोहळ्यात उपस्थित अनेकांनी घेतली. खुद्द अर्पितालाही यावेळी आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
अर्पिताने एका पत्रातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. तिने पहिल्यांदा आपल्या तिन्ही भावांचे आभार मानले. खरेतर, पत्राची सुरूवात तिने के ली होती. मात्र, वाचता वाचता तिचे डोळे पाण्याने भरले आणि ती पुढे काहीच बोलू शकली नाही. तिचे पत्र अभिनेत्री प्रियांका चोप्राने पूर्ण केले. ‘मी खूप नशीबवान होते की माझ्यासाठीच असलेल्या एका घरात मी लहानाची मोठे झाले. लहानपणापासून मी आणि सोहैलभाई एकाच खोलीत होतो. तो मला एका मित्रासारखा होता. अरबाझ भाई हा नेहमी माझ्यासाठी एक मार्गदर्शक होता. चांगले काय आणि वाईट काय याची जाण त्याने नेहमी मला करून दिली. पण, सलमान भाईचे मन सगळ्यात मोठे आहे. मी काही चुकीचे वागू शकते हे तो मान्यच क रू शकत नाही आणि म्हणूनच मी जे काही केले असेल त्या प्रत्येकवेळी तो खंबीरपणे माझ्यामागे उभा राहिला आहे’, अशा शब्दांत अर्पिताने आपल्या तिन्ही भावांबरोबर असणाऱ्या आपल्या नात्याचा उल्लेख के ला.