सलमानचा दबंग ‘चुलबुल पांडे’ सगळ्यांनाच परिचित आहे. पण आता ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाच्या प्रोमोजमध्ये सलमान वैमानिकाच्या वेशात दिसत आहे. या लूकसाठी सलमानला बरीच तारेवरची कसरत करावी लागली. त्याच्यासाठी बनवलेला वैमानिकाचा पोशाख त्याला खूपच घट्ट होत होता.
मुळात ‘बिग बॉस’मध्ये सलमान दिसणार की नाही, यावरच चर्चा रंगली होती. त्याच्या जागी शाहरूखला येणार, असेही सांगितले जात होते. पण अखेर सलमानच या सर्व अफवांवर पाणी टाकत सध्या कलर्स वाहिनीवर बिग बॉसच्या आगामी पर्वाच्या प्रमोजमध्ये एका वैमानिकाच्या भुमिकेत तो दिसत आहे. या प्रोमोचे दिग्दर्शन बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहीत शेट्टी याने केले आहे. अर्थात आतापर्यंत बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या सलमानला यंदा त्याची बहिण अलविराने प्रोमोसाठीच तंग कपडे घालण्याचे मोठे आव्हान समोर ठेवले होते.सलमानचा वैमानिकाचा लूक त्याची बहिण अलविरा खान अग्निहोत्री आणि अ‍ॅशले रिबेलो यांनी मिळून डिझाइन केला होता. याबद्दल बोलताना रिबेलोने सांगितले, ‘आम्ही या लूकसाठी बरेच संशोधन केले. कित्येक वैमानिक, त्यांचे राहणीमान, पेहराव यांचे निरिक्षण केले आणि त्यानंतर नेव्ही ब्लू जॅकेट, सफेद शर्ट आणि ट्राऊझर हा पोशाख नक्की केला. सलमानला पाहताच क्षणी हा लूक आवडला होता. पण घातल्यावर त्याला लक्षात आले, की शर्ट त्याच्या मापापेक्षा किंचित घट्ट आहे. त्याने तसे आम्हाला सांगितले सुद्धा, पण वैमानिक रुबाबदार दिसावा म्हणून त्याचा पोशाख किंचित घट्टच असतो असे सांगितल्यावर, सलमानला हे पटले आणि त्याने शेवटी हाच पोशाख घालून प्रोमोजचे चित्रीकरण पुर्ण केले.’अर्थात समोर लाडकी बहिणच स्टाईलिश म्हणून समोर उभी असल्याने सलमानला तक्रारीसाठी फारशी संधीही नव्हती. सलमान आणि अलविराचे एकमेकांवरील प्रेम सर्वाना माहितच आहे, त्यामुळे बहिणीसाठी इतकं तर तो नक्कीच करू शकत होता. बिग बॉस म्हटलं, की सगळं आलबेल असूच शकत नाही. या पर्वामध्ये सलमानचे ‘ये सफर होगा मस्त, क्युंकी इसमें ट्विस्ट होंगे जबरदस्त’ हे ब्रीदवाक्य असणार आहे. त्यामुळे यंदा स्पर्धकांसमोर कोणकोणती आव्हाने असतील, हे पहायला थोडी वाट पहावी लागेल.