‘शाहिद’साठी सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे आणि लागोपाठ ‘सिटीलाइट’सारखा वेगळा चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याकडे महेश भट्ट यांनी ‘सारांश’च्या रिमेकची जबाबदारी सोपवली आहे. १९८४ साली आलेल्या ‘सारांश’ चित्रपटाचा रिमेक करावा, अशी भट्ट यांची इच्छा होती. ‘सिटीलाइट’ला मिळालेल्या यशानंतर ‘सारांश’ला हंसल मेहताच योग्य न्याय देऊ शकतील, या विश्वासाने भट्ट यांनी त्यांची निवड केली आहे. पूजा भट्ट या चित्रपटाची सहनिर्माती असणार आहे.
‘सिटीलाइट’ पूर्ण के ल्यानंतर खरे तर समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याच्या ३७७ कलमावर मेहतांना चित्रपट बनवायचा होता. मात्र, महेश भट्ट यांनी मेहतांना पहिल्यांदा ‘सारांश’च्या रिमेकची जबाबदारी सोपवली आहे. ‘सारांश’ हा चित्रपट माझ्या कारकिर्दीतील मार्गदर्शक चित्रपट आहे, असे हंसल मला नेहमी सांगत आला आहे. त्याच्या तरुणपणी त्याने ‘सारांश’सारखा चित्रपट बनवायचा प्रयत्नही केला होता. पण, तो अजिबात यशस्वी झाला नाही. त्याच्याबरोबर ‘सिटीलाइट’सारखा चित्रपट केल्यानंतर मात्र तोच या रिमेकला योग्य न्याय देऊ शकेल, असे वाटल्यानेच मी त्याच्याकडे हा चित्रपट सोपवला आहे, असे महेश भट्ट यांनी सांगितले. याही चित्रपटात हंसल मेहतांचा लाडका आणि यशस्वी कलाकार राजकुमार यादवच ‘बी. व्ही. प्रधान’ ही अनुपम खेर यांनी साकारलेली भूमिका करणार असल्याची अटकळ आहे.  न्यूयार्कमध्ये वास्तव्याला असलेल्या आपल्या मुलाचे अपघाती निधन झाल्याचे कळल्यानंतर ते सत्य स्वीकारण्यासाठी झगडणाऱ्या वृद्ध मराठी जोडप्याची कथा ‘सारांश’मध्ये रंगवण्यात आली होती. अनुपम खेर यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता आणि त्यांचे वय तेव्हा अवघे २८ होते. त्यामुळे ‘सारांश’च्या रिमेकमध्येही प्रधानांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आम्हाला कोणत्याही वयस्कर अभिनेत्याची गरज नाही, असे पूजा भट्टचे म्हणणे आहे. हंसल मेहता आणि राजकु मार यादव यांची जोडी इतकी अफलातून जमली आहे की आम्ही ‘सारांश’साठीही त्याच दोघांची निवड केली आहे, असेही ती म्हणाली.
‘सारांश’ हा महेश भट्ट यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे ‘सिटीलाइट’नंतर मेहतांवर प्रेम जडलेल्या भट्ट यांनी त्यांना ‘सारांश’साठी मिळालेली उत्कृष्ट दिग्दर्शकाची फिल्मफेअर ट्रॉफीही मेहतांना भेट म्हणून दिली. गेल्या महिन्यात २५ मे रोजी ‘सारांश’ला ३० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने, पुन्हा एकदा नव्याने या चित्रपटाची कथा रंगवण्यावर भट्ट कॅम्पकडून विशेष जोर दिला जातो आहे.