‘मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ (मामि) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि मराठी चित्रपटांचे नाते गेल्या काही वर्षांत दृढ झाले आहे. दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरच्या मराठी चित्रपटांना नेहमीच ‘मामि’ महोत्सवात स्थान मिळाले आहे. मात्र, यावर्षी ‘मामि’ महोत्सवात पहिल्यांदाच नव्या दमाच्या मराठी दिग्दर्शक आणि त्यांच्या चित्रपटांनी गारूड केल्याचे पहायला मिळते आहे. १४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण सात मराठी दिग्दर्शकांचे नवीन चित्रपट पहायला मिळणार आहेत. शिवाय, याच महोत्सवाचा भाग असलेल्या ‘डायमेन्शन्स मुंबई’ या लघुपट महोत्सवातही सहा मराठी दिग्दर्शकांचे लघुपट स्पर्धा विभागात आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या ‘मामि’ महोत्सवात नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली आणि महोत्सवाचा पुरस्कारही मिळाला होता. यावर्षी महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग, इंडिया गोल्ड २०१४ आणि न्यू फेसेस इन इंडियन सिनेमा अशा तीन विभागांमधून सात मराठी दिग्दर्शकांच्या चित्रपटांची निवड झाली आहे. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात निवड झाली आहे. आपण बऱ्याचदा हिंदी चित्रपटांमधून न्यायालयात घडणाऱ्या कामकाजाचे अतिरेकी चित्रण नाटय़ पाहिलेले आहे. ‘कोर्ट’ मध्ये पहिल्यांदाच न्यायालयीन कामकाज वास्तव स्वरूपात मांडलेले पहायला मिळेल, असे चैतन्य ताम्हाणे यांनी सांगितले. ‘कोर्ट’मध्ये कनिष्ठ न्यायालयातील कामकाज, तिथले आजूबाजूचे वातावरण यांचा धागा पकडून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाला व्हेनिस चित्रपट महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटातील भाषा आणि संस्कृ ती यांच्याशी सुतराम संबंध नसतानाही तिथल्या प्रेक्षकांचा चित्रपट पाहिल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो थक्क करणारा होता. त्यामुळे आता ‘मामि’ महोत्सवात घरच्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल उत्सूकता असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले.
‘कोर्ट’ बरोबर आणखी एका चित्रपट चर्चेत आहे तो म्हणजे प्रसाद नामजोशी दिग्दर्शित ‘रंगा पतंगा’. विदर्भातील जुम्मन नावाच्या शेतक ऱ्याची कथा या चित्रपटात रंगवण्यात आली असून मकरंद अनासपुरे पहिल्यांदाच मुस्लिम शेतक ऱ्याच्या गंभीर भूमिकेत पहायला मिळणार असल्याची माहिती नामजोशी यांनी दिली. या दोन चित्रपटांबरोबरच विवेक वाघ दिग्दर्शित ‘सिध्दांत’, अविनाश अरूण दिग्दर्शित ‘द फोर्ट’ (किला), महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित ‘डोंबिवली रिटर्न’, जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘नागरिक’ आणि भाऊराव क ऱ्हाडे दिग्दर्शित ‘ख्वाडा’ हे चित्रपट ‘मामि’ महोत्सवात पहायला मिळणार आहेत.