भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली गेलेली आपली तुलना ही आपली प्रशंसाच आहे, असे शाहरुख खान म्हणाला. पण, मोदी आणि त्याचा व्यवसाय हे भिन्न असल्यामुळे त्याला ही तुलना थोडी चमत्कारिक वाटते.
मोदी भारताचे नेता आहेत. त्यांनी देशाला पुढे न्यावे अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो. तर, दुसरीकडे मी देशाचे मनोरंजन करावे अशी लोकांची माझ्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे, त्यांच्याशी केली गेलेली तुलना मला ही जरा चमत्कारिक वाटते पण, त्यास मी माझी प्रशंसा म्हणून घेतो, असे शाहरुख ‘हॅप्पी न्यू इयर’च्या प्रसिद्धीवेळी म्हणाला. ज्याप्रमाणे मोदी देशाच्या राजकारणात प्रसिद्ध आहेत त्याप्रमाणे तू चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेस, त्याबद्दल तुझे काय म्हणणे आहे असे विचारले असता शाहरुख म्हणाला की, मला ही तुलना ऐकायला आवडली पण, ती बरोबर आहे असे मला वाटत नाही, कारण, त्यांचा आणि माझा व्यवसाय वेगळा आहे. ते एक मोठे नेता आहेत. लोकांचे त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांना खूप पसंतही करतात. त्यामुळे त्यांच्याशी केली गेलेली तुलना ही माझी प्रशंसाच आहे.
शाहरुखचा ‘हॅप्पी न्यू इयर’ हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होत आहे.