बॉलिवूडच्या कलाकारांसाठी आपल्या स्वत:च्या मालकीची ‘व्हॅनिटी व्हॅन’ असणे ही प्रतिष्ठेची व श्रीमंतीची बाब झाली आहे. अमूक किंवा तमूक कलाकारापेक्षा माझ्याकडे असेलेली ‘व्हॅनिटी’कशी भारी आहे, हे दाखविण्याचा प्रयत्नही यातून होत असतो. बॉलिवूडच्या ‘खान’दानातील एक असलेल्या शाहरुखकडेही लवकरच एक नवी आणि अत्याधुनिक ‘व्हॅनिटी’ येणार असून त्याची किंमत फक्त चार कोटी रुपये इतकी आहे.कार आणि ऑटोमोबाईल डिझायनिंगमधील एका अग्रगण्य कंपनीने ही व्हॅनिटी तयार केली आहे. कंपनीचे मालक दिलीप छाबडिया हे शाहरुखसाठी ही अत्याधुनिक व्हॅनिटी तयार करत असून यात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.शाहरुख खान याला एका अत्याधुनिक व्हॅनिटीची आवश्यकता होती आणि त्याने त्यासाठी छाबडिया यांच्या कंपनीची निवड केली. छाबडिया यांच्या कंपनीनेच शाहरुखसाठी या अगोदरही व्हॅनिटी तयार केली होती. शाहरुखची नवी व्हॅनिटी अत्याुधनिक असून विज्ञान-तंत्रज्ञानाचा यात वापर करण्यात आला आहे.या व्हॅनिटीमध्ये काचेचा तळ (फ्लोअरिंग) असून विश्रांती कक्ष, स्वयंपाकगृह, रंगभूषेसाठी विशेष खुर्ची व कक्ष, इनबिल्ट शॉवर या आणि अशा विविध सोयी यात करण्यात आल्या आहेत. येत्या महिनाभरात ही व्हॅनिटी तयार होणार असून त्यानंतर बॉलिवूडचा ‘किंग’खान या अत्याधुनिक आणि महागडय़ा व्हॅनिटीचा वापर करणार आहे.