शाहरूख खानचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला. शाहरूखच्या ‘फॅन’ या आगामी चित्रपटाचा टीझर पोस्टर चित्रपटकर्त्यांकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी ‘किंग खान’ सज्ज झाला आहे. चित्रपटाचे अधिकृत टि्वटर हॅण्डल असलेल्या @FanTheFilm ने ‘फॅन’चा पोस्टर टि्वट केला आहे. शाहरूख सदृश्य पाठमोरी व्यक्ती पोस्टरवर दृष्टीस पडते. ‘आ रहा है सबसे बडा सुपरस्टार का सबसे बडा फॅन’ पोस्टरवरील ही ओळखदेखील लक्ष वेधून घेते. हातात ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ असलेली ही पाठमोरी व्यक्ती ‘सबसे बडा’ सुपरस्टारची फॅन असल्याचे जाणवते. याआधी शाहरूख खानच्या बंगल्याच्या भिंतीवर “SRK, See you on 15th. Gaurav” अशी इंग्रजीतील ओळ रंगवून दिग्दर्शक मनीष शर्मा आणि निर्माता आदित्य चोप्राने चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अनोखी शक्कल लढवली होती. शाहरूखच्या बंगल्याच्या भिंतीवरील या ओळीमुळे टि्वटरकरांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु हा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग असल्याचे नंतर लक्षात आले. ‘फॅन’ ही गौरव नावाच्या एका चाहात्याची कथा आहे. चंदेरी दुनियेतील एका सुपरस्टारचा तो परम चाहता आहे. दिग्दर्शक मनीष शर्माचा ‘फॅन’ पुढील वर्षी १५ एप्रिलला चित्रपटरसिकांना भेटायला येत आहे.