कित्येक गिर्यारोहक आयुष्यभर एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न मनाशी घेऊन आयुष्यभर त्याच्यासाठी झगडत असतात. गिर्यारोहकांच्या याच स्वप्नांचा ठाव घेणारी आणि त्यांच्या या प्रवासाचे कथन करणारी आशुतोष गोवारीकर यांची ‘एव्हरेस्ट’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्लस’वर येत आहे. आपल्या वडिलांच्या नजरेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या आणि त्यासाठी एव्हरेस्टचे शिखर सर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलीची कथा या मालिकेमध्ये मांडण्यात आली आहे.
हिंदी मालिकांच्या विश्वामध्ये एखाद्या मालिकेचे चित्रीकरण थेट एव्हरेस्टवर जाऊन करण्याचे धाडस प्रथमच या मालिकेतून करण्यात आले आहे. एका नायिकेच्या नजरेतून घडत असलेल्या या मालिकेमध्ये एकाच वेळी भावनिक आणि शारीरिक कसब साधायचे हे शिवधनुष्य पेलले आहे, २०१२च्या ‘मिस इंडिया साऊथ’ची विजेती क्षमता अंचलने एक मॉडेल म्हणून कारकीर्द घडवताना अशी आव्हानात्मक भूमिका साकारण्यामागचा आपला विचार स्पष्ट करताना ती सांगते की, ‘कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर धोके स्वीकारल्याशिवाय तुम्हाला स्वत:ची ओळख निर्माण करता येत नाही’.
सौंदर्यस्पर्धा विजेत्या क्षमताने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. ‘दरम्यान एका जाहिरातीमध्ये आशुतोष गोवारीकर यांनी मला पाहिले आणि माझ्यात त्यांना या मालिकेची नायिका सापडली. त्यानंतर माझ्या या भूमिकेसाठी तीन ते चार लूक टेस्ट झाल्या आणि त्यातून मग अंतिम निवड करण्यात आली.’
शक्यतो एकदा सौंदर्य स्पर्धा जिंकल्यावर मॉडेल्स आपला मोर्चा शक्यतो बॉलीवूडकडे वळवतात. पण, क्षमता मात्र आपले असे काहीच उद्दिष्ट नसल्याचे सांगते. ‘मी सुरुवातीपासून अमूक याच पद्धतीने पुढे जायचे असे काही लक्ष्य ठरवले नव्हते. स्पर्धा संपल्यावर मला जाहिरातींसाठी विचारणा केली गेली आणि मी त्या क्षेत्रामध्ये सुरुवात करायचे ठरवले.’ त्यातूनच पुढे तिला या मालिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. या मालिकेच्या निमित्ताने तिने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले. त्या अनुभवाबद्दल बोलतान, या भूमिकेसाठी मला अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. पण, त्याचबरोबर आम्हाला गिर्यारोहण करण्याचे प्रशिक्षणसुद्धा घ्यायला लागले. एव्हरेस्ट शिखर सर करणे ही सोप्पी गोष्ट अजिबात नाही आणि त्यामुळे त्यातील प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा बाबींबद्दल आम्हाला माहिती देण्यात आली होती. एव्हरेस्ट सर करण्याच्या आव्हानाची सुरुवातच मुळी तिथे पोहोचल्यावर पहिले तिथल्या थंडीशी सामना करणे इथपासून होते. आमचा खरोखरच कस लागला तिथे.. अर्थात, यासाठी आमची सर्वाची मानसिक आणि शारीरिक तयारी करून घेण्यात आली होती. आम्ही नवीन आहोत. किंवा आशुतोष गोवारीकर, मिलिंद गुणाजी असे सगळे आमच्याभोवती आहेत, अशी खास भावना मुळात त्यांच्यापैकी कोणी करून दिली नाही. त्यामुळे आम्ही सगळे नवीन कलाकार असूनसुद्धा त्यांच्यासोबत काम करण्याचे दडपण कधीच आले नाही, असे क्षमताने सांगितले.