बॉलिवूडमधील काही अभिनेत्री अंगप्रदर्शन आणि सततच्या वादविवादांसाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी एक आहे शर्लिन चोप्रा. ‘कामसूत्र ३डी’ चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे सध्या ती चर्चेत आहे. शर्लिन चोप्राने ‘कामसूत्र ३डी’ चित्रपटाचा दिग्दर्शक रुपेश पॉलविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शर्लिन चोप्राने लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘कामसूत्र ३डी’ या तिच्या चित्रपटापासून स्वत:ला अलिप्त ठेवले असून, अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील आणि सांताक्रुझ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे ‘कामसूत्र ३डी’चा दिग्दर्शक रुपेश पॉलविरुद्ध फसवणूक, लबाडीचा आरोप करून तक्रार दाखल केली आहे. रुपेश पॉलने खोट्या कागदपत्रांच्या आधारे आपल्याला ‘कामसूत्र ३डी’ चित्रपट स्वीकारण्यास भाग पाडून आपली फसवणूक केली असून, चित्रपटाची उर्वरित रक्कम देण्यास देखील तो अडवणूक करत असल्याचे तिने पत्रात म्हटले आहे. रुपेशने आपल्याला धडा शिकविण्यासाठी ‘कामसूत्र ३डी’ चित्रपटातील आपला रोल नवीन मुलीला देऊन, चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मी साकारलेली काही नग्न दृष्ये प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचा आरोप शर्लिनने केला. त्याचप्रमाणे रुपेश पॉलने आपल्याला अश्लिल ई-मेल पाठविल्याचा आरोप देखील तिने केला. याप्रकरणी रुपेश पॉलवर योग्य कारवाई करण्याची विनंती शर्लिन चोप्राने पोलिसांना केली आहे. ‘कामसूत्र ३डी’ चित्रपटाच्या अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका नवीन ट्रेलरमध्ये शर्लिन चोप्राला दाखविण्यात आले नसल्याने, तिने आपल्याविरुद्ध तक्रार केल्याचे दिग्दर्शक रुपेश पॉलने प्रसिद्धी माध्यमांकडे पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वर्षी मे महिन्यात ‘कामसूत्र ३डी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.