अभिनेते अजय वढावकर हे कर्करोगाने आजारी असून या रोगावरील उपचारांसाठी शिवसेना चित्रपट सेनेकडून वढावकर यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. शिवसेना चित्रपट शाखेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या वतीने चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व अभिनेते शरद पोंक्षे यांनी कांदिवली येथे वढावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि ५० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांना सुपूर्द केला.
वढावकर यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला असून, गेल्या काही वर्षांपासून मधुमेहाच्या त्रासामुळे त्यांनी काम थांबविले होते. गेल्या दोन-चार वर्षांत ते ‘झी’ टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आले होते, मात्र आता त्यांना कर्करोग झाला असून यावरील उपचार त्यांच्यावर सुरू आहेत. वढावकर यांच्या आजारपणाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती मिळाली होती. त्यांनी याची तातडीने दखल घेऊन वढावकर यांना आर्थिक मदत द्यावी, अशा सूचना शिवसेना चित्रपट सेनेला केली होती.
त्यानुसार शिवसेनेचे सचिव आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या मार्गदर्शनानुसार चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष शरद पोंक्षे यांनी वढावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे राहात असत. तोच आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वढावकर यांच्या आजाराची दखल घेऊन त्यांना चित्रपट सेनेकडून मदत करण्याची सूचना दिली. या वेळी शिवसेना चित्रपट सेनेचे बाळा साटम, शरद राणे, विजय परब, रवी समेळ, केतन रोडे, भूषण चव्हाण, कायदे सल्लागार डेव्हिड मोजेस उपस्थित होते.