‘वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे गेली काही वर्षे लघुपटनिर्मितीसाठी चित्रपटकर्मीना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. लघुपटांवर उमेश कुलकर्णी यांचे खास प्रेम आहे. त्यांची दिग्दर्शक म्हणून ओळखही याच माध्यमातून झाली होती. त्यामुळे एक प्रकारे लघुपटनिर्मितीची चळवळच त्यांनी सुरू केली असून लघुपटनिर्मितीचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ते घेतात. २६ ते २९ डिसेंबर या कालावधीत पुण्यात त्यांनी ‘शूट ए शॉर्ट’ ही लघुपटनिर्मिती कार्यशाळा आयोजित केली आहे.
‘शूट ए शॉर्ट’ या कार्यशाळेत स्वत: उमेश कुलकर्णी आणि प्राध्यापक समर नखाते हे मार्गदर्शन करणार आहेत. लघुपटनिर्मितीचे महत्त्व विशद करताना, ‘डिजिटल तंत्रज्ञानामुळे चित्रपट बनवणं तांत्रिकदृष्टय़ा सोपं झालं असलं तरी एक कलामाध्यम म्हणून लघुपट तयार करणं ही आव्हानात्मक गोष्ट आहे. लघुपटनिर्मितीसाठी केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नसून लघुपटाची मूलभूत संकल्पना, त्याकडे कला व माध्यम म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन याही बाबी कलानिर्मितीसाठी आवश्यक असतात’, असं उमेश कु लकर्णी यांनी सांगितलं.
या कार्यशाळेत लघुपटनिर्मिती प्रक्रियेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शन केले जाणार आहे.
लघुपटाची संकल्पना ते निर्मितीपर्यंतचा प्रवास, निर्मितीसाठी आवश्यक पूर्वतयारी, चित्रीकरण प्रक्रिया, कलाकार व तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम करण्याची पद्धत, लघुपटाचे संकलन, महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याबद्दल सखोल चर्चा या कार्यशाळेत केली जाणार आहे.