ऑस्करविजेत्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटात सलीम ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता मधुर मित्तल हा अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, गेल्या महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या या अपघाताच्यावेळी मधुर स्वत: गाडी चालवत होता. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याची गाडी थेट एका ट्रकला जाऊन धडकली. या अपघातानंतर त्याच्या मित्रांनी मधुरला लगेचच रूग्णालयात नेले. त्यानंतर मधुरवर तब्बल १५ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. यापैकी १० दिवस तो पुर्णपणे बेशुद्ध होता. त्याच्या चेहऱ्याला आणि विशेषत: जबड्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सध्या त्याला दोन महिने सक्त आराम करण्याची ताकीद दिली आहे. दरम्यान, दहा दिवसांनी मधुरला शुद्ध आल्यानंतर त्याने थोडाफार बोलण्याचाही प्रयत्न केला. “देवाने मला दुसरे आयुष्य दिले आहे. अतिशय भयंकर अपघातातून माझा जीव वाचला आहे. मी सर्व तरुणांना सांगू इच्छितो की, कार चालवताना सीट बेल्ट लावा. कारण सीट बेल्ट लावल्यानेच माझा जीव वाचला आहे.”, असे मधुरने यावेळी सांगितले. माझा ७० टक्के चेहरा या अपघातात जायबंदी झाला आहे. मात्र, आता माझ्या चेहऱ्याची सूज ओसरत आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरमध्ये मेक्सिकोमध्ये होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलच्या आधी मी पूर्णपणे बरा होईन, अशी मला आशा असल्याचेही त्याने म्हटले आहे. दरम्यान, या अपघातानंतर ‘स्लमडॉग मिलेनिअर’मधील त्याच्या सहकलाकारांनी त्याची विचारपूस केली. चित्रपटामध्ये मधुरसोबत काम केलेल्या अभिनेता देव पटेलने मधुरच्या कुटुंबियांसोबत प्रकृतीसंदर्भात चर्चा केली. शिवाय अभिनेता अनिल कपूरनेही मधुरच्या प्रकृतीची विचारपूस केली.