हिंदी चित्रपट पहिल्यांदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात ते त्यांच्या पोस्टर्समधून. हाताने रंगवलेली हिंदी चित्रपटांची मोठमोठी पोस्टर्स ही इथल्या प्रेक्षकांना कलाकारांशी जोडून घेणारी नाळ होती. आपल्याकडचा पहिला बोलपट ‘आलम आरा’ ते ‘मुघल-ए-आझम’, ‘यहुदी’, ‘मदर इंडिया’सारख्या नावाजलेल्या विविध हिंदी चित्रपटांचे पोस्टर्स, काही कृष्णधवल छायाचित्रे, मूळ पटकथांच्या प्रती असा अनमोल खजिना ‘ओशियन ऑक्शन हाऊस’ने आयोजित केलेल्या लिलावात चाहत्यांसाठी खुला झाला होता. या लिलावात सुपरस्टार शाहरूख खानने के. आसिफ यांच्या गाजलेल्या ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाचे दोन पोस्टर्स ६.८४ लाख रुपयात विकत घेतले.
‘ओशियन ऑक्शन हाऊस’ने गेले काही दिवस हा खजिना ‘ग्रेटेस्ट इंडियन शो ऑन अर्थ’ नावाने प्रेक्षकांसाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहण्यासाठी उपलब्ध केला होता. शुक्रवारी रात्री या प्रदर्शनातील दुर्मीळ पोस्टर्स आणि इतर गोष्टींचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. ज्यात सर्वाधिक किमतीत ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाचे दोन पोस्टर्स विकत घेऊन शाहरूखने आपले चित्रपटप्रेम विशेषत: अभिनयाचे बेताज बादशाह दिलीपकुमार यांच्याबद्दलचे प्रेम पुन्हा अधोरेखित केले. या लिलावातून ओशियनकडे ५५.६० लाख रुपये जमा झाले आहेत. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद ही नायकत्रयी आणि मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी यांच्या चित्रपटांच्या पोस्टर्सना सर्वाधिक मागणी होती, अशी माहिती आयोजकांनी दिली. दिलीपकुमार आणि मीनाकुमारी यांच्या ‘यहुदी’ चित्रपटाचे पोस्टर ४.८ लाख रुपयांना विकले गेले, तर ‘श्री ४२०’ चित्रपटातील राज कपूर आणि नर्गिस यांचे एका छत्रीतील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ गाण्याचे छायाचित्र ७.५ लाख रुपयांना विकले गेले. याशिवाय, १९६२ साली आलेल्या दिलीपकुमार यांच्या ‘गंगा जमुना’ चित्रपटाचे आर्टवर्क २.१६ लाख रुपयांना तर ‘मदर इंडिया’चे पोस्टर २.५२ लाख रुपयांना विकले गेले. पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या ‘आनंद’ आणि ‘बावर्ची’ या दोन चित्रपटांचे पोस्टर्स, रेखा-विनोद मेहरा अभिनित ‘घर’ आणि ‘मेरी जंग’सारख्या चित्रपटांच्या मूळ पटकथा अशा अनेक वस्तूंना लिलावात चांगली बोली मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.